जितेंद्र आव्हाडांची फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा
मुंबई दि.13 जुलै 2024
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत महायुतीने महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे एक अतिरिक्त जागा जिंकत सरशी साधली. यामध्ये 11 जागांपैकी भाजपने पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
या निवडणुकीत काँग्रेसची पाच ते आठ मते फुटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या आमदारांना 100 कोटींचा विकास निधी आणि पाच कोटी रुपये वेगळे मिळाल्याचा दावा केला आहे.
या निवडणुकीचा निकाल काल रात्री जाहीर झाला. त्यानंतर सर्वत्र महाविकास आघाडीच्या फुटलेल्या मतांचीच चर्चा होती. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत फुटलेल्या आमदारांनी किती पैसे मिळाले याबाबात सांगितले आहे.
आव्हाड आपल्या पोस्टमध्ये म्हणाले,”आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय.
आपल्या पोस्टमध्ये आव्हाड पुढे म्हणाले, “पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार?”