अहमदनगर बातम्यानगर लोकसभेत पुन्हा 'काटें की टक्कर'

नगर लोकसभेत पुन्हा ‘काटें की टक्कर’

spot_img
spot_img

 

तब्बल ३३ वर्षानंतर विखे विरुद्ध गडाख फाईटची चर्चा, पहा समिकरणं…

अगदी कोर्टापर्यंत गेलेली १९९१ ची नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक आठवतेय..? होय, तीच निवडणूक जी जिल्हाभर नाही तर देशभर गाजली होती. विखे विरुद्ध गडाख. स्वर्गीय बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख. या लढतीने त्यावेळी जिल्हा हादरला होता. आता पुन्हा ३३ वर्षानंतर पुन्हा विखे विरुद्ध गडाख लढतीची शक्यता वाढली आहे.

नगर जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्याचं राजकारण चालतं. थोरात, गडाख, काळे, राजळे, घुले हे एकमेकांचे पाहुणे. दुसरीकडे कर्डिले, कोतकर, जगताप हेही पाहुणे. या सगळ्या घराण्यातं उठून राहते ते विखे घराण्याचे नाव. स्वर्गीय बाळासाहेब विखे यांना जिल्हाभर मानणारा गट आजही आहे. विखेंचं आणि त्यांच्या प्रवरा यंत्रणेचं राजकारणचं वेगळं. शेवटच्या क्षणाला फासे फिरविण्याची त्यांची खासियत. प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा नेता म्हणून स्वर्गिय बाळासाहेब विखेंकडे पाहिले जाते. त्यांचे नातू खासदार सुजय विखेही आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण करताहेत. उत्तरेतून येऊन थेट दक्षिणेच्या खासदारकीवर ते विराजमान झालेत. पुढली निवडणूकही भाजपकडून तेच लढविणार. आता त्यांच्याविरोधात कोण या चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झाल्यात. त्यांच्याविरोधात सगळ्यात जास्त वेळा चर्चेत आलेलं नाव म्हणजे नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख…

बघूया दक्षिणेची नेमकी गणितं काय आहेत..?

खा. सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभेसाठी सगळ्यात पहिल्यांदा नाव आलं ते पारनेरचे आमदार निलेश लंके यांच. त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके या ही चर्चेत आल्या होत्या. मात्र आता लंके अजितदादांच्या गटात गेल्याने ते आता भाजपसोबत सत्तेत आहेत. दुसरीकडे गेल्यावेळी प्रतिस्पर्धी आमदार संग्राम जगताप हेही यावेळी चर्चेबाहेर आहेत. अशा वेळी विखेंना टफ फाईट देणारा नेता म्हणून फक्त गडाखांचाच पर्याय उरतो.

गडाखांना ही निवडणूक सोपी आहे का, ते पाहू…

गडाखांचा नेवासा मतदारसंघ लोकसभेसाठी नगर उत्तरेत येतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे मतदान होणार नाही. मात्र वडिल ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना दक्षिणेतील अनेक तालुक्यात मानणारे कार्यकर्ते आहेत. शिवाय शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट, काँग्रेसचा थोरातांचा गट, दक्षिणेत पावरफुल्ल आहे. त्यामुळे हे सगळे विरोधक एकत्र येऊन शंकरराव गडाखांचे काम प्रामाणिकपणे करण्याची शक्यता जास्त आहे. स्वतः शरद पवारांचा या मतदारसंघावर होल्ड आहे. त्यामुळे सुजय विखेंविरोधात गडाख हेच सध्यातरी सर्वात उत्तम पर्याय होऊ शकतात.

लोकसभेसाठी अजून किमान वर्षभराचा अवधी आहे. गडाखांनी आत्तापासून लोकसभेची तयारी केली, तर त्यांच्यासाठी संधी भरपूर आहेत. दुसरीकडे भाजपचेचे आमदार राम शिंदे यांचे सुजय विखेंसोबत जास्त सख्य नाही. त्यामुळे जामखेड- कर्जत या दोन महत्त्वाच्या तालुक्यात गडाख मोठा लीड घेऊ शकतात. नगर, पारनेर, श्रीगोंद्यात शरद पवारांचा गट पाँवरफुल्ल आहे. तेथेही ते चांगले चालू शकतात. शेवगाव व पाथर्डीत व्याही घुलेंचा वरचष्मा आहे. शिवाय भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या जवळच्या नातलग आहेत. त्यामुळे ते तालुकेही गडाखांना साथ देण्याची शक्यता आहे.

ही सगळी गणिते पाहता गडाख लोकसभा लढवतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अजून तरी गडाखांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र तेही इच्छुक आहेत, हे न लपणारे आहे. दक्षिणेची लढत नेमकी कोणात होणार हे लवकरच कळेल, तोपर्यंत सर्वांना लोकसभेसाठी नगरी पंचकडून शुभेच्छा…

लेटेस्ट न्यूज़