मुंबई दि.09 ऑक्टोबर 2023
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता उडाला बोजवारा, सामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू,
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणात ही परिस्थिती का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? याची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून याबाबतचे सत्य मांडावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. या पत्रात थोरात यांनी लिहले की, राज्याची आरोग्य व्यवस्था सलाईनवर गेली आहे, आरोग्यमंत्री म्हणतात याला काही मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा होत नाही तर, संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
चौकट !
नांदेड आणि महाराष्ट्रात घडलेल्या घटनेसंदर्भात शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरुन काही निष्कर्ष काढले आहेत. त्यात सांगण्यात आलेली कारणे न पटण्यासारखी असल्यामुळे, उच्च न्यायालयाने स्व-पुढाकाराने याचिका दाखल करुन त्या याचिकेच्या सुनावणीत शासनावर गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. शासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना या मृत्युंबाबतची जबाबदारी दुसरीकडे ढकलता येणार नाही, असे थोरात यांनी पत्रात नमूद केले आहे.