पिसोरे खांड येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न
श्रीगोंदा दि. 5 ऑक्टोबर 2023
राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम कै. प्रेमराज ढवळे यांनी केले. राजकारणातून समाजकारण करण्याची खरी मुहूर्तमेढ ढवळे आण्णांनी रोवली, अशा शब्दांत बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथे आयोजित वर्षश्राद्ध श्रद्धांजली कार्यक्रमात शेलार बोलत होते.
सामाजिक कार्यात ‘आण्णा’ नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. प्रेमराज ढवळे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पिसोरेखांड येथील ढवळेवस्ती वर नुकताच झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील दिग्गज नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. उपस्थितांनी आण्णांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती विषद करताना, ढवळे यांनी नव्वदच्या दशकात राजकारणाला समाजकारणाची दिलेली जोड विषद केली. ते पिसोरेखांड सोसायटीचे संचालक होते, त्याच बरोबर त्यांनी लघुपाटबंधारे विभागात ‘मिस्तरी’ या पदावर काम केले होते, तालुक्यात सर्वत्र ‘पेमा मिस्तरी’ या नावाने ते परिचित होते.
आमदार बबनराव पाचपुते यांचे त्यावेळचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या आण्णांनी पुढील काळात वेगळी वाट धरत मांडवगण गटात पाहुणे असलेल्या ‘जगताप’ कुटुंबियांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम केले. उपस्थितांनी आण्णांच्या जिवनाचा परिचय करुन देताना सामान्यांसाठी समाजकारण करणारा कार्यकर्ता म्हणून आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांचा समाजकारणाचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी असाच अविरत चालू ठेवावा,असा मोलाचा सल्लाही दिला.
यावेळी डाँ. प्रणोतीमाई जगताप, सुवर्णाताई पाचपुते, मिनाक्षी ताई सकट,भाजपचे बाळासाहेब महाडिक, राष्ट्रवादीचे शरद नवले, जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप, मा. रयत जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, युवा उद्योजक दिग्विजय नागवडे, मा.सरपंच भिमराव नलगे, पिसोरे खांडचे सरपंच विकास इंगळे, दैनिक लोकमतचे पत्रकार राजेंद्र घोडके आदींसह तालुक्यातील सर्वपक्षिय नेते कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मिनीनाथ ढवळे व युवराज ढवळे कुटुंबियांनी वडिलांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतूक केले. युवा कार्यकर्ते मिनीनाथ भोईटे यांनी सूत्रसंचालन केले, तर पत्रकार गायत्री ढवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी पंढरपूर येथील ह.भ.प.स्वप्नील महाराज खोरे यांचे किर्तन झाले.