पाणीप्रश्ना संदर्भात आ.तनपुरे यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन
राहुरी दि.7 नोव्हेंबर 2023
माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त
तनपुरे (शरद पवार गट) हे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशावरून आक्रमक झाले आहेत. ‘समन्यायी पाणी वाटप कायदा मुळा धरणाच्या मुळावर उठला असून, या कायद्याचे पुनर्विलोकन करावे. जायकवाडी पाणी देणे म्हणजे पाण्याचा अपव्यय आहे. आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीद्वारे अनधिकृत पाणीउपसा करणारे आणि दारूच्या कारखान्यांना वापरले जाणार आहे. हा निर्णय रद्द करावा. यासाठी तीव्र आंदोलन करू’, असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला नगर जिल्ह्यातून विरोध आहे. यातून राजकीय संघर्ष पेटू पाहत आहे. अकोले, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासे येथून पाणी सोडण्याच्या आदेशाला विरोध सुरू आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र अजून भूमिका स्पष्ट केली नव्हती. यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी चर्चा होती. मात्र, आमदार तनपुरे यांनी आज राहुरी येथील तहसीलदार चंद्रजीत राजपूत, मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले.श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मुळा पाटबंधारेचे उपअभियंता विलास पाटील, बाबासाहेब भिटे, विलास शिरसाठ, आदिनाथ तनपुरे, दिलीप इंगळे, विजय कातोरे, आप्पासाहेब ढूस, बाळासाहेब खुळे उपस्थित होते.
आ.तनपुरे यांनी या वेळी समन्यायी कायद्यावर विषमन्यायी अशी टीका केली. आमदार तनपुरे म्हणाले, “नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. राहुरी तालुक्यात यंदा सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झाला आहे. दुष्काळाच्या झळा आता बसू लागल्याने टँकरची मागणी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडणे म्हणजे, 50 टक्के पाण्याची नासाडी करणे आहे. याचा फटका राहुरीसह नगर जिल्ह्याला बसणार आहे.””जायकवाडीचे आठ, तर मुळा धरणातून तीन आवर्तन होतात. जायकवाडीतून रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू आहे. मुळा धरणातून रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचे नियोजन अद्याप नाही. जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्ये हजारो अनधिकृत विद्युत पंप आकडे टाकून तीन-चार टीएमसी पाणी उपसा करीत आहेत. आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीच्या अनधिकृत पाणीउपसा व दारूच्या कारखान्यांना वापरले जाणार आहे. यामुळे समन्यायी पाणीवाटपाची तत्त्वं येथे लागू होत नाहीत. शेतकऱ्यांची भावना भावनाहीन सरकारला पोहोचविण्याचे काम केले आहे. आज (मंगळवारी) या प्रश्नावरील याचिकेवर सुनावणी आहे. यावर जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही तनपुरे यांनी दिला.