कुख्यात कैदी कारागृहाचे गज कापून पळाले, ड्युटीवरच्या पोलिसांना कळालेच नाही..
संगमनेर दि.8नोव्हेंबर2023
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी पलायन केले. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी कारागृहाच्या खिडकीचे गज कापले.बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.
संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील कारागृहात या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या कारागृहात ठेवलेले असतात. कारागृहामध्ये तीन पोलिस बंदोबस्तास होते; मात्र असे असतानाही चार कैद्यांनी जेलचे गज कापले आणि ते फरार झाले. राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव अशी या चार कैद्यांची नावे आहेत.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी कारागृहात मोठमोठ्याने गाणे तसेच आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. त्यांना पळू जाण्यासाठी कोणी मदत केली, साहित्य कोणी पुरवले याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.