Friday, December 20, 2024

टक्केवारी द्या, बिल घ्याचा फंडा चव्हाट्यावर, सरपंचासह पती अटकेत…

एसीबीची कारवाई महिला सरपंचासह पती लाच घेताना पकडले 

श्रीगोंदा दि. 24 नोव्हेंबर 2023

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतच्या ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या 10% टक्के कमिशन एकूण 40 हजार रूपयांची लाच स्विकारताना सरपंच आणि त्यांचे पती यांना लाचलुचपत पथकाने पकडले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सरपंच उज्वला सतिष रजपूत (32) व त्यांचे पती सतिष बबन रजपूत यातील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम अशा कामांचा 4 लाख 61 हजार 568 रूपयांचे कॉन्ट्रक्ट घेतले होते. त्यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केली. यानंतर त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच उज्वला सतिष रजपूत यांना विनंती केली असता, त्यांनी एकूण बिलाच्या 10% प्रमाणे 46 हजार रूपयांची लाचेची मागणी केली.

या प्रकरणी तक्रारदाराने अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिनांक 10 जुलै 2023 तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 10 जुलै 2023 रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचेकडे 46 हजाराची लाच मागणी करुन, सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. बिल जमा झाल्यानंतर काल गुरूवारी (दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी महिला सरपंच यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन बोलविले असता, कोकणगाव ग्रामपंचायत येथे सापळा लावण्यात आला.सापळा कारवाई दरम्यान सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांच्या पतीने कोकणगाव ग्रामपंचायत कार्यालयात सदर लाच रक्कम स्वीकारली. तर त्यांना तेथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यादरम्यान सरपंच उज्वला रजपूत व सरपंचपती सतीश राजपूत या दोघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार, कर्मचारी रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक दशरथ लाड आदींचा पथकांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या