Friday, December 20, 2024

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा :आ.पवार

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार रोहित पवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कर्जत-जामखेड दि.2 डिसेंबर 2023

कर्जत/ जामखेड | राज्यात खरीपचा हंगाम हाता-तोंडाशी आला असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नवं संकट उभं राहिलं आहे. राज्यातील १७ जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्राला त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कर्जत-जामखेडमध्ये देखील शेतीतील पिकं अक्षरश: भुईसपाट झाली आहेत, तसेच अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. दिनांक २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने ज्वारी, मका, तूर, ऊस, कांदा, द्राक्षे यासह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन मदत जाहीर करावी अशी मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

कर्जत-जामखेडमध्ये अगोदरच दुष्काळाने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे, त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा उरला-सुरला घास देखील हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. कर्जत-जामखेडमधील खर्डा, वाघा, घोडेगाव, पिंपळगाव उंडा या भागात मोठ्या प्रमाणात गारपिट झाली असून, जामखेड तालुक्यातील ४० गावातील ८००० हेक्टरहून अधिक शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, अकोले, श्रीगोंदा, राहता, संगमनेर या तालुक्यातही अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत जाहीर करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कर्जत- जामखेडसह अन्य तालुके देखील अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असून यावर्षी पर्जन्यामान कमी झाल्याने शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असतानाच अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतीतील उत्पन्नावर कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या