पाटेगाव खंडाळा ‘एमआयडीसी’ बाबत आज बैठक
कर्जत: दि.12 डिसेंबर 2023
कर्जत-जामखेड मतदातसंघांत होणाऱ्या पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी बाबत आज मंगळवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसे आदेश उद्योग मंत्रालयाने काढले असून बैठकीच्या निमंत्रितांच्या यादीत भाजप आमदार राम शिंदे यांचे नाव असले तरी कर्जत एमआयडीसीसाठी गेल्या दोन अधिवेशनात आग्रही राहिलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा उल्लेख नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे ‘शिंदें’ना बोलावलं अन् ‘पवारां’ना टाळलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरुन कर्जत – जामखेडKarjat – Jamkhed राजकारण पेटण्याची शक्यता आहे. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारRohit Pawar यांनी विधानसभेच्या गेल्या दोन्ही अधिवेशनात आग्रही भूमिका मांडली. यासाठी त्यांनी एकदा विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.
मात्र उद्योगमंत्री आदींनी आश्वासन देऊनही प्रस्तावित कर्जत एमआयडीसीच्या अधिसूचनेवर सही झालीच नाही. यामुळे संतप्त झालेल्या रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसी होण्यात स्थानिक राजकीय विरोधकांना जबाबदार धरत नाव न घेता राम शिंदे यांच्यावर श्रेयवादावरून निशाणा साधला होता.
सध्या नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यानच आ. पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. आज मंगळवारी या यात्रेचा समारोप नागपूरमधे होत आहे. आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारSharad Pawar यांचा वाढदिवस असून वाढदिवसाचे औचित्य साधत यात्रेच्या समारोप होत आहे. यानिमित्ताने एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले असून महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
रोहित पवार संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज व्यस्त असतानाच नेमकी आजच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रास्ताविक कर्जत एमआयडीसी बाबत बैठक बोलावली असून बैठकीस उद्योग आणि एमआयडीसी संबंधित अधिकाऱ्यांसोबत राम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे निमंत्रितांच्या यादीत नेमके एमआयडीसी साठी आग्रही राहत रणकंदन करणाऱ्या आ. पवार यांचे नाव नसल्याने यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. उद्योज मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीच्या आदेशाची आ. शिंदे यांच्यासह त्यांच्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल माध्यमातून चांगलीच प्रसिद्धी केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मविआ सरकार मध्ये कार्यवाही सुरू झालेल्या कर्जत एमआयडीसीला आता महायुती सरकारच्या काळात तरी अधिसूचनेला मंजुरी मिळणार का? असा प्रश्न असून आज रोहित पवारांच्या अनुपस्थित होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार का? याचीही मोठी उत्सुकता असणार आहे.