टवाळखोरांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा_
अहमदनगर दि 13 डिसेंबर 2023
रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर केक कापून फटाके फोडून शांतता सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या टवाळखोरांना आता आपला वाढदिवस थेट पोलीस ठण्यात साजरा करण्याची संधी मिळणार आहे.
त्याला कारणही तसंच आहे,’नगर शहरातील सर्व आस्थापना रात्री ११ नंतर बंद केल्या जातात.मात्र काही टवाळखोर दहशत निर्माण करण्यासाठी रात्री उशिरा केक कापून फटाके फोडून प्रसंगी केक कापण्यासाठी धारदार शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.अनेकवेळा भाईगिरीचे प्रदर्शन करतात.एवढेच नव्हे तर या भाईगिरीचे प्रदर्शन केलेले फोटो व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून दहशत करण्याचा प्रयत्न करतात.असे कृत्य करणे कायद्याच्या विरोधात असून याचा समाजमनावर विपरीत परिणाम होतो. काही दिवसांपूर्वी नगर येथील बंगालचौकी परिसरात रात्रीच्या वेळी वाढदिवस करणाऱ्या काहींच्या गाड्या पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. आता रात्री-अपरात्री रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या टवाळखोरांवर कोतवाली पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.नागरिकांना त्रास झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडवल्यास किंवा असा कोणताही प्रकार घडत असल्यास ११२ वर कॉल करावा अथवा पोलीस निरीक्षक यांच्या ७७७७९२४६०३ या क्रमांकावर माहिती कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे आवाहनही करण्यात आले आहे.
युवकांनो, अशा चुका करू नका!
भाईगिरी, दहशत आदी गैरप्रकारांमध्ये युवा पिढीने अडकू नये.नागरिकांना धमकवण्यासाठी व त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मोठी गर्दी करून शस्त्रांचा वापर करून अशा घटना घडवल्या जातात. मात्र अशा प्रकारांवर कोतवाली पोलीसांचा ‘वॉच’ आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधिताची व कुटुंबाची बदनामी होते त्यामुळे युवकांनी अशा चुकाच करू नयेत.