अवैध जार व्यावसायिकांची पळापळ वाढणार; श्रीगोंदेकरांचे आरोग्य धोक्यात
श्रीगोंदा दि.14 डिसेंबर 2023
श्रीगोंदा शहर व तालुक्यात गल्लोगल्ली झालेल्या शुद्ध पाण्याच्या प्लॅन्टकडे कुणाचेच लक्ष नाही. या शुद्ध पाण्याची गुणवत्ता खरंच आहे का, हा प्रश्न आहे. याबाबत काही सजग नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर श्रीगोंदा नगरपरिषदेला जाग आली. अखेर बुधवारी (ता. १३) श्रीगोंदा नगरपरिषदेने जार व्यावसायिकांना १५ दिवसांच्या आत परवाना कागदपत्रे सादर करण्याचे नोटिशीद्वारे कळविले आहे.
शुद्ध पाण्याचा प्लॅन्ट सुरु करायचा असल्यास केंद्रीय भुजल सर्वेक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, दुकान नोंदणी परवाना, नगर परिषद व्यवसाय परवाना, मशिनरी टेस्टींग रिपोर्ट आदींसह सुमारे १० प्रकारचे परवाने आवश्यक असतात. मात्र या सगळ्या परवान्यांकडे कानाडोळा करत अवैध पद्धतीने जिल्हाभर हा व्यवसाय फोफावला आहे. श्रीगोंदा शहर व तालुक्यातही अवैध जार व्यवसायाचे धंदे जोरात आहेत. या व्यावसायिकांची सध्या चांदी झाली आहे. कुणीही बोअर मारून शुद्ध पाण्याच्या नावाखाली जार व्यवसाय सुरु करत आहे. थंड पाण्याचा जार २० रुपये, तर साध्या पाण्याचा जार १० रुपये प्रमाणे सर्रास विक्री सुरु आहे. मात्र या पाण्याची खरंच गुणवत्ता आहे का, हा प्रश्न श्रीगोंदेकरांना पडला आहे.
सध्या श्रीगोंदे शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. हे आजार पाण्यामुळे जास्त फैलावत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र प्रशासनाने आत्तापर्यंत या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. अनेकांनी तक्रार केल्यानंतर मात्र नगर परिषदेला जाग आली. मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या सहीने शहरातील सर्व आरओ प्लाँन्ट धारकांना बुधवारी नोटीसा काढण्यात आल्या. त्यानुसार १५ दिवसांच्या आत व्यावसायिकांनी त्यांच्याकडील सर्व परवाने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई खरोखर होणार का, की फक्त फार्स ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगर परिषदेने अवैध प्लान्ट सील करुन श्रीगोंदेकरांच्या आरोग्याशी खेळणे थाबावे, अशी अपेक्षा सध्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.