आपणही सत्तेत जाऊ शकलो असतो… शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचे मोठे विधान..
श्रीरामपूर दि.22 डिसेंबर 2023
दीड वर्षे सत्तेत राहून काम करता आले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून विरोधकाची भूमिका कणखरपणे निभावत आहोत. सहा महिन्यांपूर्वी आपणही सत्तेत जाऊ शकलो असतो.
आपल्यालाही मंत्री पदाची सवय झाली होती. पण शेवटी आपला विचार गहाण ठेवायचा नाही. शरद पवार, जयंत पाटील हे आपले आदर्श आहेत. सत्ता मिळते म्हणून आपले विचार गुंडाळून ठेवायचे नसतात. मनाला पटले नाही म्हणून येथेच थांबण्याचा निर्णय घेतला, असे विधान माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.
आमदार तनपुरे म्हणाले, “शरद पवार यांच्या विचाराने कधी कोठे जातीधर्माला थारा दिला नाही. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस यांचा विकासाचा सातत्याने विचार केला. या देशाची अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून आहे. मात्र, केवळ मतांवरती डोळे ठेवत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू या घोषणेवरती सध्याचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. आज कांद्याचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडायला लागले, तर यांनी निर्यातबंदी केली. दूध व्यवसायातून शेतकऱ्याच्या हातात खेळते भांडवल यायला लागले तर त्याचेही भाव दहा-दहा रुपये कमी झाले आहेत. यानंतरही सरकारने दूध पावडरच्या आयात-निर्यात धोरणात कुठेही बदल केलेले नाहीत. आता कुठे पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली तीही सहकारी संघांना दूध घालणाऱ्यांना मिळेल. निर्यातबंदी करणार नाही, चार पैसे माझ्या शेतकऱ्याच्या हातात पडले तर कुठे बिघडते, अशी भूमिका घेणारा एकमेव कृषी मंत्री म्हणजे शरद पवार हे होय”.
श्रीरामपूर विधानसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असले तरी श्रीरामपूरचे आमदार हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. सत्तेत असलेल्या समोरच्यांची बेरीज 288 पैकी 200 पर्यंत गेली असली तरी प्रस्थापितांविरोधातही निवडून येता येते, हा इतिहास आहे. मंत्री पदाच्या कार्यकाळात या मतदारसंघातील विजेचा प्रश्न प्रामुख्याने सोडविला आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास कधीही आवाज द्या, हा प्राजक्त तनपुरे तुमच्यासाठी उभा असेल. शरद पवारांच्या विचाराचा दाखल देत आगामी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ताकत देण्याचे आश्वासन देत माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी श्रीरामपुरात राष्ट्रवादीची नव्याने मोट बांधण्याचा निश्चय केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. पक्षाचे प्रवक्ते संदीप वर्पे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुभाष आदिक, प्रकाश पाउलबुधे, अविनाश जगताप, सुरेश निमसे आदी उपस्थित होते.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राज्य सरकारच्या पीक कर्ज वसुलीच्या स्थगितीवरून मोठा धोका सांगितलाय. राज्य सरकारने पीक कर्ज वसुली स्थगिती केल्याने पीक कर्जदार ३१ मार्च अखेरपर्यंत थकबाकीत जाण्याचा धोका आहे. राहुरीतील एका कार्यक्रमात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आर्थिक शिस्तीविषयी मत व्यक्त केले.