रस्ता सुरळीत होईपर्यंत आमरण उपोषण: जगताप
श्रीगोंदा दि.26 डिसेंबर 2023
श्रीगोंदा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या व शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या या रस्त्यावरील अतिक्रमण काढून मंदिरात जाणाऱ्या भक्तांसाठी रस्ता खुला करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गेणबा जगताप हे आज पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबत दिलेल्या निवेदनात श्री. जगताप यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा शहरातील मुख्य पेठे लगत श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. या मंदिराची नोंद राज्य पुरातत्व खात्याकडे आहे. तसेच सदरील मंदिरास पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. याठिकाणी मोठया संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. अतिक्रमणामुळे सध्या या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ताच अस्तित्वात नाही. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत असून त्यांची अवहेलना होत आहे. तसेच मंदिराकडे समोरून येणारा रस्ता बंद झाल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
सध्या मार्गशीर्ष महिना प्रारंभ झालेला असून यानिमित्ताने भाविकांची संख्या वाढत आहे. परंतु रस्ता नसल्यामुळे त्यांना मंदिराकडे पोहचता येत नाही. तरी प्रशासनास विनंती करतोत की, सदरील प्रकरणी आपण लक्ष घालून पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले पुरातन श्री महालक्ष्मी देवीचे मंदिराकडे समोरच्या बाजूने येणारा व इतर बाजूने येणारे रस्ते त्वरित खुले करून मिळावेत अन्यथा मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर याठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यानुसार जगताप यांनी आज उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणाला दिनेश गुगळे यांनी पाठिंबा दिला आहे.
या उपोषण /आंदोलनाचे निवेदन दत्तात्रय जगताप यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी, नाशिक पुरातत्व विभागाचे सहायक संचालक, जिल्हा पोलिस अधिक्षक, श्रीगोंदा तहसिलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले आहे.