.तर अजित पवारांच्या गळ्यात उडी मारीन : मनोज जरांगे
अहमदनगर दि.23 जानेवारी 2024
अजित पवारांनी मराठ्यांच्या बाजूने सरकारशी बोलले पाहिजे. ते आरक्षण घेऊन आले, तर मी त्यांच्या गळ्यात उडी मारीन. कारवाईची भाषा करणार असतील, तर आम्हीही सोडणार नाही, असा दम मनोज जरांगे यांनी सोमवारी भरला.
बाराबाभळी (जि. नगर) येथे मुक्कामाच्या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही सात महिने दम धरला. अनेकजण आमच्या भेटीला आले; पण अजित पवार आले नाहीत. तुम्हाला गाडी नसेल, तर आम्ही एस.टी. बसचे तिकीट काढून देतो.
त्यांनी कारवाईची भाषा करू नये; अन्यथा आम्ही त्यांच्यामुळेच कारवाई झाली असे म्हणू, असा इशारा जरांगे यांनी दिला. जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवरही निशाणा साधाला. छगन भुजबळ हे जर मराठ्यांच्या कुणबी नोंदींना आव्हान देणार असतील, तर आम्ही मंडल आयोगालाच आव्हान देऊ. मात्र, आम्हाला गोरगरीब ओबीसींचे नुकसान करायचे नाही. आम्ही गावखेड्यात गुण्यागोविंदाने राहतो. उलट भुजबळांनीच ओबीसींची अडचण केली. ओबीसी बांधवांना मराठ्यांविरुद्ध भडकावण्याचे काम भुजबळ करीत आहेत, असे जरांगे म्हणाले.
जरांगे म्हणाले की, 25 तारखेला मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. तिथे उभे राहण्यासही जागा मिळणार नाही, याची जाणीव सरकारला नाही. सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडता येत नसते, हे सरकारला माहीत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. आमरण उपोषणाला परवानगी मिळाली नाही तरी उपोषणाला बसणार आहे, असेही ते म्हणाले.