अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी भरीव निधीची तरतूद
अहमदनगर दि.2 फेब्रुवारी 2024
अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमनगर- बीड- परळी- वैजनाथ या मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेमार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प नसून प्रगतीच्या वाटा खुल्या करणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पामध्ये रेल्वेच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला १५ हजार ५५४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या बजेटमधून विविध नवीन रेल्वे मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण सुविधा गतीमान होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यात अहमनगर- बीड- परळी- वैजनाथ या मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या मार्गाचे काम अधिक जलद गतीने होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, शेगाव, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदे व कर्जत त्याच बरोबर बीड मधील केज, परळी, अंबेजागाई, आष्टी, गेवराई तालुक्याला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला आणि युवा या विकसित भारताच्या चार स्तंभांना सक्षम करण्यावर देखील भर देण्यात आला आहे. “लखपती दीदी” च्या माध्यमातून देशातील ३ कोटी महिलांचा कौशल्य विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनविले जाणार आहे. यामुळे हा अर्थसंकल्प अधिक महत्वाचा ठरत असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी भरीव तरतूद केल्यामुळे खासदार डॉ. सुजय विखेंनी रेल्वे मंत्र्यांसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त केले.