बेलवंडी पोलिसांनी दोन दिवसात लावला तपासाचा छडा
श्रीगोंदा दि.2 फेब्रुवारी 2024
अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनेच खून करण्याची घटना बेलवंडी पोलिसांनी आज उघडकीस आणली. तालुक्यातील कोथूळ येथे ३० जानेवारीला ही घटना घडली होती. पोलिसांनी तपासानंतर पत्नी तिचा प्रियकरासह पुण्यातील पाच आरोपींना आज अटक केली. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील कोथूळ येथे ३० जानेवारीला योगेश सुभाष शेळके (रा. कोथूळ, ता. श्रीगोंदा) या तरुणाचा झोपेतच कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. मृताची पत्नी आरती योगेश शेळके (वय २६) हिने दिलेल्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिसांनी अनोळखी चार जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. आपला पती झोपेत असताना चार अनोळखी लोकांनी घरात प्रवेश करुन पतीच्या गळ्यावर, हातावर कोयत्याने वार केल्याचे तसेच आपल्याही गळ्याला कोयता लावून आरडोओरडा केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते. पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दोन पथके स्थापन करुन तपास सुरु केला. पोलिसांनी आजूबाजूला याबाबत विचारपुस केली असता मृताची पत्नी व फिर्यादी असलेल्या आरती हिच्यावर संशय बळावला. मृतासोबत कायम दारु पिणाऱ्या तीन-चार जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. फिर्यादी आरतीनेही हेच आरोप असावेत, असे सांगितले. मात्र पोलिसांचे समाधान होत नव्हते. अखेर दोन दिवस तांत्रिक तपास केल्यानंतर मृताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईल क्रमांकावर घटनेच्या दिवशी सकाळी पुणे येथील रोहीत साहेबराव लाटे (वय २३ ) याचा फोन आल्याचे समजले. पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले.
पोलिसांनी रोहीतकडे चौकशी केली असता त्याने मृताची पत्नी आरतीसोबत अनैतीक संबंध असल्याचे कबूल केले. आपले प्रेमसंबंध कुणाला कळू नये म्हणून रोहित व आरती स्नॅपचॅटच्या माध्यमातून चॅटिंग करत असल्याचेही सांगितले. मृत योगेशला पत्नीचे प्रेमसंबंध कळल्यानंतर तो दारु पिऊन आरतीला मारहाण करत असे. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी पतीला संपविण्याचा प्लॅन आरतीने आखला. त्यानुसार पुण्यातील तरुणांना दीड लाख रुपये सुपारी देण्यात आली. ३० तारखेला दोन मोटरसायकलवर येत आरोपींनी झोपेत असतानाच सुभाषचा कोयत्याने गळा कापून खून केला.
रोहितच्या कबूलीनंतर पोलिसांनी मृताची पत्नी आरती योगेश शेळके, रोहीत साहेबराव लाटे (दोघे रा. कोथूळ, ता. श्रीगोंदा), शोएब महमंद बादशाह (वय 22 रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज सतिष गाडे, (वय 19 रा. सोलापुर बाजार, कॅम्प पुणे), आयुष शंभु सिंह (वय 18), पृथ्वीराज अनिल साळवे (वय 19), अनिश सुरेंद्र धडे (वय 19, तिघे रा. घोरपडे पेठ, पुणे) यांना बेलवंडी पोलीस स्टेशनला आणले. पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.