शेलार यांच्या कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद ; तालुक्यात पहिल्यांदाच ज्येष्ठमातांचाही सन्मान…
श्रीगोंदा दि.16 फेब्रुवारी 2024
ओसंडून वाहणारा महिलांचा उत्साह, विविध सन्मानजनक उपक्रम आणि तजेलदार वातावरणात श्रीगोंद्यात होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नेते घनःश्याम शेलार यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या कार्यक्रमात सुमारे हजारांवर महिलांची उपस्थिती होती. बोचऱ्या थंडीतही महिला मंडळाच्या उत्साहाने कार्यक्रमात रंगत आणली. महिलांचा कार्यक्रम असल्याने स्टेजवर जाणे टाळणाऱ्या आण्णांना, माय-भगिनींनी अक्षरशः आग्रह करुन स्टेजवर बसवले. संसाराच्या गाड्यात हरवलेल्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शेलारांनी उपलब्ध करुन या उपक्रमाचे कौतूक झाले.
मनिषा शेलार यांच्या संकल्पनेतून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी रविवारी सायंकाळी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संगित खुर्चीपासून, ओव्या, नाव घेण्याच्या स्पर्धांपर्यंत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विजेत्या महिलांना पैठणीपासून भेटवस्तूपर्यंत अनेक बक्षिसे वाटण्यात आली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण महिलांसोबत ज्येष्ठ महिलांसाठीही विविध स्पर्धा खेळविण्यात आल्या. या स्पर्धाही अशा रंगल्या की, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर कौतूकाचे हास्य उमटले. हळदी-कुंकू कार्यक्रमातही उत्तरोत्तर रंगत आली.
एक नंबर मानाची पैठणी चैत्राली निलेश साळुंखे (चोराचीवाडी) यांनी जिंकली याचबरोबर चार उपविजेत्यांनी विविध स्पर्धेत पैठणी जिंकल्या.
कार्यक्रम महिलांसाठी असला तरी शेलारांनी आगामी निवडणुकांची पेरणी यातून केल्याचे जाणवले. त्यांनी स्टेजवर येणे टाळले मात्र महिलांच्या आग्रहानंतर त्यांनी काही वेळ या कार्यक्रमासाठी दिला. श्रीगोंद्यातून विधानसभा लढविण्याचा मानस शेलारांनी यापूर्वीच स्पष्ट केला आहे. मात्र संधी मिळाली तर, लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारीही त्यांनी केली आहे. नगराध्यक्ष शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष मीरा शिंदे, सरपंच मीनाक्षी सकट, सनराइज् कॉलेजच्या प्राचार्य राजश्री शिंदे, माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे मृणाल शेलार आदींसह विविध मान्यवर, कष्टकरी महिला यावेळी उपस्थित होत्या. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे संचालन गवते सरांनी केले. प्रशांत शेलार, आनंदकर सर, यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.