घनःश्याम शेलारांचा पुन्हा आरोप; पत्रकार परिषदेत विचारले विखेंना प्रश्न
श्रीगोंदा दि 20 फेब्रुवारी 2024
ज्येष्ठ नेते घनःश्याम शेलार यांनी केलेल्या ‘चुनावी जुमला’ या आरोपांना खा. सुजय विखेंनी यांनी श्रीगोंदा तालुका दौऱ्यात खोडून काढले. विकासकामे होत असताना, काही जणांच्या पोटात दुखायला लागते, असा आरोप, विखेंनी शेलारांचे नाव न घेता केला होता. आज शेलार यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा या आरोपांना खोडून काढत विखेंचा हा चुनावी जुमलाच असल्याचा आरोप केला. याशिवाय विखे कसे अपयशी ठरले, याचा पाढाच पत्रकारांसमोर वाचला.
शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले, श्रीगोंदा एमआयडीसी झाली, तर मी विखेंचा सत्कारच करील. मात्र साकळाई पाणी योजना व एमआयडीसी हे दोन्ही प्रश्न विखे पिता-पुत्रांना फक्त निवडणुकीवेळीच आठवतात. मी प्रत्येक कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहील, असे आश्वासन खा. सुजय विखेंनी गेल्या निवडणुकीवेळी दिले होते. याशिवाय पुणेकरांकडून कुकडी कालव्यात हस्तक्षेप होतो म्हणून कुकडीचे अधिक्षक अभियंता कार्यालय नगरमध्ये आणण्याचाही शब्दही विखेंनी गेल्या निवडणुकीत दिला होता. मात्र हे कार्यालय गेल्या पाच वर्षांत विखेंना नगर जिल्ह्यात आणता आले नाही. नगर- दौड रस्त्याच्या फुटपाथचा प्रश्नही खासदारांना पाच वर्षात मार्गी लावता आला नाही. लेंडीनाला, विसापूर गेट, लोणी व्यंकनाथ या गावांतील तसेच श्रीगोंदा कारखाना परिसरातील रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलही विखेंना गेल्या पाच वर्षात करता आला नाही. गेल्या निवडणुकांत दिलेल्या अनेक कामांचे विखेंचे आश्वासन हवेतच विरले. एवढेच कशाला, नगर एमआयडीसीतही गेल्या पाच वर्षांत मोठा उद्योग विखेंना खासदार म्हणून आणता आला नाही, असा आरोपही शेलारांनी केला.
शेलार पुढे म्हणाले की, कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला आजही पानेच पुसली जातात. गेल्या पाच वर्षांत डाँ. सुजय विखेंचा कारभार पाहिला, तर ते सपशेल अपयशी खासदार ठरल्याचे दिसते. याशिवाय आता श्रीगोंद्यात होऊ घातलेली एमआयडीसीही मिनी एमआयडीसी आहे. त्यामुळे त्याचा किती फायदा होईल, मोठे उद्योग येतील का, या शंकाही आहेत. या पत्रकार परिषदेत शेलारांनी गेल्या लोकसभेच्या वेळी विखेंनी दिलेल्या आश्वासनाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. राज्यात व केंद्रात सत्ता असूनही विखेंना आश्वासने पूर्ण करता येत नसल्याने ते सपशेल अपयशी खासदार ठरले आहेत, असा टोलाही शेलारांनी लगावला.