ताज्या बातम्यामहादेव जानकर यांच्या 'रासप'ला 'माढा'ची ऑफर! बारामतीत धनगर समाजाच्या मतांसाठी पवारांची राजकीय...

महादेव जानकर यांच्या ‘रासप’ला ‘माढा’ची ऑफर! बारामतीत धनगर समाजाच्या मतांसाठी पवारांची राजकीय खेळी!

spot_img
spot_img

बारामतीची लोकसभेची जागा चर्चेत…

बारामती दि.6 मार्च 2024

राज्यातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे गट पडल्यानंतर बारामतीची लोकसभेची जागा चर्चेत आली आहे.

बारामती मतदारसंघांमध्ये पवार कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे त्यांनी आता राष्ट्रीय समाज पक्षाकडे मैत्रीचा हात पुढे करून बारामतीमधील धनगर समाजाची मते आपल्या पारड्यात झुकवण्यासाठी राजकीय खेळी केली आहे.

खासदार कन्या सुप्रिया सुळे यांना जिंकून आणण्यासाठी अध्यक्ष शरद पवार यांची ही मोठी रणनीती यशस्वी झाली तर महायुतीच्या उमेदवाराला बारामतीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जाण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची घोषणा करून पवार कुटुंबात एकच खळबळ उडवून दिली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडे त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांना लोकसभेला जागा सोडून त्या बदल्यात बारामतीमधील धनगर समाजाची मते सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात टाकण्याची ही खेळी आहे. असे झाले तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढा लोकसभेची जागा रासपला देण्याची ऑफर दिली आहे. माढा मतदारसंघात शरद पवार यांचा जर हा जानकर फॅक्टर चालला तर बारामतीचा गड सुरक्षित राहील, असे गणित बांधण्यात येत आहे.

जानकर यांनी २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार मते मिळाली होती. त्याची टक्केवारी ४८. ८८ इतके होती. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना तब्बल ४ लाख ५१ हजार इतकी मते मिळाली होती. टक्केवारीत हे प्रमाण ४२.३५ इतके होते.

२०१४ मध्ये भाजपने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला होता व मुख्य लढत ही सुळे विरुद्ध रासप अशीच झाली होती. महादेव जानकर यांना मिळालेल्या मतांमध्ये धनगर समाजाच्या मताचा सर्वाधिक वाटा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना जिंकून आणण्यासाठी महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघ सोडून त्या बदल्यात बारामतीमधील धनगर समाजाच्या मतांचा गठ्ठा सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीशी उभा करण्यासाठीची शरद पवारांची राजकीय खेळी कितपत यशस्वी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप पुढील अडचणी वाढणार

शरद पवार यांनी ही राजकीय खेळी खेळल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे खासदार आहेत. या ठिकाणी पुन्हा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी अकलूजकर मोहिते-पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. निंबाळकरऐवजी मोहिते-पाटील कुटुंबातील एकाला लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीचा तिढा अद्यापही कायम असतानाच आता शरद पवार यांच्या महादेव जानकर यांना देण्यात आलेल्या माढा लोकसभेच्या जागेच्या ऑफरमुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शरद पवार यांनी खेळलेली राजकीय खेळी कितपत यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर माढ्यात महादेव जानकर यांच्या रासपला जागा सोडून बारामतीत कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना जानकर यांच्या माध्यमातून एकगठ्ठा मते मिळविण्यासाठीचा हा राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

 

 

लेटेस्ट न्यूज़