Wednesday, December 18, 2024

अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही कारवाई, पुणे पोलिसांचे कठोर पाऊल

वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुणे दि.18 मार्च 2024

 

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या मध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत तसचं अनेक ठिकाणी वाहनांचे तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत

 

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्यंतरी शहरात कोयता गँगची दहशत वाढल्याचे चित्र होते. शहरातील लोकवस्तीत हातात कोयता घेऊन टोळी टोळी करुन गुन्हेगार फिरत होते. या टोळक्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये वाढता सहभाग पाहता पुणे पोलिसांनी महत्त्वाचे पाउल उचलले आहे. अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवरसुद्धा कारवाई होणार आहे.

 

पुणे शहरानंतर लातूरमध्ये देखील एका कोयता गँगने चांगलीच दहशत माजवली आहे. या कोयता गँगने काही दिवसांपासून शहरात दहशत निर्माण केली होती. खंडणी वसुली करणे, गाड्यांची तोडफोड करणे, लोकांना दहशत दाखवणे, असा प्रकार या कोयता गँगने सुरु केला होता. दरम्यान, आता पोलिसांनी जिथे दहशत निर्माण केली, त्याच जागेवर नेत त्यांना धडा शिकवला आहे. पोलिसांनी या कोयता गँगची धिंड काढली आहे. भाजीविक्रेते,फळ विक्रेते यांना कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी त्याच ठिकाणी नेऊन प्रसाद ही दिला आहे.

 

अल्पवयीन मुलांकडून जर कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे सुद्धा आहे. त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसचं पुण्यात कोयत्याने हल्ले रोखण्यासाठी शहरात कुठे कुठे कोयते विकल्या जातात यावर पोलिसांकडून लक्ष देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, वाढत्या वाहन तोडफोडीच्या घटना तसेच हातात कोयता घेऊन दहशत करणाऱ्या टोळीला चाप लावण्यासाठी पुणे पोलीस नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनीदेखील कोयता गँगचा सुपडा साफ करण्याचे आदेश दिले होते. गुन्हेगारांनी जर ऐकलं नाही तर त्यांना थेट टायरमध्ये टाकणार असे देखील संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळं पोलिस आयुक्त कोयत्या गँगची दहशत मोडित काढण्यासाठी अॅक्शन प्लॅन राबवत असल्याची चर्चा आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या