रस्ता रोको आंदोलनाला आमदार तनपुरे यांनी दिली भेट
राहुरी:18 मार्च 2024
मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे व त्यातून टक्केवारीचा लाभ घेण्यासाठी विविध विकासकामांना आडकाठी आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. केवळ श्रेय घेण्यासाठी धावपळ करणाऱ्यांची किव येते, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
शनिवारी राहुरी- म्हैसगाव रस्त्यावरील मोमीन आखाडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. तनपुरे बोलत होते. आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना आमदार तनपुरे म्हणाले, की नेहमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.
या रस्त्यांची दैना फिटावी म्हणून महाविकास आघाडीचे सरकार असताना विविध विकास कामे मार्गी लावली. अपघाताने सरकार आल्यानंतर झोपेतून काही जण जागे झाले व न केलेल्या कामाचा श्रेयवाद घेऊ लागले.
आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांना स्थगिती देऊन आडकाठी आणली व आम्हीच काम मार्गी लावल्याचा खटाटोप करू लागली. रस्त्यांच्या कामाचा कार्यारंभ आदेश असतानाही कामे सुरू करण्यास विलंब का केला जात आहे? असा सवाल केला.
मल्हारवाडी रस्त्यावरील खिंड येथे रस्त्याचे काम का बंद पडले? अशी विचारणा संबंधित ठेकेदाराला केली असता वन खात्याची हद्द असल्याचे कारण सांगितले. त्यावर आमदार तनपुरे अधिकच उग्र झाले.
वन खात्याच्या हद्दीतील दगडी खान राजरोसपणे चालू आहेत; मात्र जनतेच्या हितासाठी रस्त्याचे काम बंद पाडले, कोणत्याही परिस्थितीत काम बंद पडता कामा नये, अशी तंबी देत प्रसंगी आम्ही पाठीमागे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
चिंचाळे येथेही तब्बल एक वर्षानंतर काम सुरू करून उद्घाटन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे खडे बोल सुनावले. यापूर्वी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केल्यानंतर कामे सुरू झाली. सत्ताधाऱ्यांच्या या वर्तुणुकीचा हिशेब जनता नक्कीच चुकता करील असा अशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नवाज देशमुख, सुरेश गाडे, अनिल गाडे यांची भाषणे झाली. आंदोलनात बारागाव नांदुरचे सरपंच प्रभाकर गाडे, माजी संचालक नारायण जाधव, विश्वास पवार, बाजार समितीचे संचालक मंगेश गाडे, किशोर कोहकडे, राजेंद्र गाडे, श्रीराम गाडे, बाळासाहेब गाडे, मारुती हारदे,
नानासाहेब गाडे, सुरेश निमसे, साहेबराव शिंदे, मधुकर कोहकडे, अशोक कोहकडे, राजेंद्र सरोदे, किशोर जाधव, पप्पू माळवदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान एसटी बसने जात असणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. विनंतीनंतर त्यांना सोडण्यात आले.