उत्कर्षा रूपवते यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
शिर्डी दि.19 एप्रिल 2024
महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. रूपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ‘वंचित’कडून लढणार असल्याचे निश्चित झाल्याने शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे टेन्शन वाढले आहे.
‘वंचित’ शिर्डीत कोणाचा पत्ता गुल करणार, याची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री दादासाहेब रूपवते आणि माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांची नात, काँग्रेसचे दिवंगत नेते प्रेमानंद रूपवते आणि स्नेहजा रूपवते यांच्या उत्कर्षा (Utkarsha Rupwate ) या कन्या आहेत. काँग्रेसच्या (Congress) महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या म्हणून त्या काम करतात. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी बराच प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत त्यांना यश आले नाही.
काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी बराच काळ ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. या काळात रूपवते यांनी ‘वंचित’चे डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या संपर्कात आल्या. मतदारसंघातील गणित मांडल्यानंतर ‘वंचित’मध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा पाठवून दिला. ‘वंचित’च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी रुपवते यांना उमेदवारी जाहीर केली.
उत्कर्षा रूपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघात ‘वंचित’मार्फत मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या एन्ट्रीने शिर्डी (Shirdi) मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहे. प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग शिर्डीत मोठा आहे. तसेच ‘रिपाइं’चे कार्यकर्ते महायुतीवर नाराज आहेत. ‘रिपाइं’चे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शिर्डीतून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ‘रिपाइं’चा हा नाराज गट वंचितच्या मागे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचा फटका खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) की माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchore) यापैकी कोणाला बसतो, हे पुढे पाहायला मिळेल. मात्र ‘वंचित’च्या एन्ट्रीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोखंडे आणि वाकचौरे यांच्यातील थेट लढत ऐवजी तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. ‘वंचित’ शिर्डीत कोणाचा पत्ता गुल करणार, याचीच चर्चा सध्या रंगली आहे.
उत्कर्षा रूपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीच्या दृष्टीने मध्यंतरी दौरे वाढवले होते. त्यात त्यांनी सातत्य ठेवले. शिर्डी मतदारसंघात महिला संघटनदेखील मोठे आहे. याशिवाय युवा वर्गाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रूपवते यांना काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु ती पूर्ण न झाल्याने त्यांची कोंडी झाली होती. उत्कर्षा यांचे वडील प्रेमानंद यांची 2009 च्या निवडणुकीत अशीच कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा त्याग करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना 23 हजार मते मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अपक्ष न लढता ‘वंचित’च्या तिकिटावर लढण्याचा निर्णय उत्कर्षा रूपवते यांनी घेतला आहे.