नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार
पुणे दि.14 जून 2024
Nilesh Lanke-Gajanan Marne | अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha) नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची (Gangster Gajanan Marne) लंके यांनी भेट घेतली.
तसेच त्याने केलेला सत्कार देखील स्वीकारला. लंकेंचा सत्काराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळं लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची भेट घेतली. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या भेटीवरुन अजित पवार यांनी पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले होते, असे अजिबात घडता कामा नये, असेही बजावले होते.
कोण आहे गजा मारणे
गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात झाला. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो तीन वर्ष येरवडा कारागृहात होता. गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर सहा पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात गजा मारणे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
हम आह भी करते हैं तो… अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र
हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता… अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले आहे. ज्यावेळी पार्थ पवार गजा मारणे भेट झाली त्यावेळी मोठा गदारोळ केला होता.
आज नीलेश लंके सन्मानाने सत्कार स्वीकारत असल्याने बारामती अथवा अहमदनगरमधील काही अप्रिय घडामोडींमागे गजा मारणेचा देखील हात होता का हे पाहिले पाहिजे असे ते म्हणाले.