ताज्या बातम्यास्फोट तर झाला , गुन्हे कोणते दाखल होणार ?

स्फोट तर झाला , गुन्हे कोणते दाखल होणार ?

spot_img
spot_img

 

हे अंबानीच घर नसलं तरी, साहेब गरीबांच्या जिवावर बेतलंय… मोठे मासे शोधा

श्रीगोंदा, ता. १५ जून २०२४

तालुक्यातील टाकळीकडेवळीत आज सायंकाळी स्फोट झाला. विहिरीच्या कामात जिलेटीनचा चुकीचा वापर केल्याने तीन कामगारांचे प्राण गेले. रात्री उशीरा पोलिस यंत्रणा कामाला लागली मात्र या प्रकरणातील मोठे मासे सापडतील का, हा खरा प्रश्न आहे.

 

विहीरीच्या कामासाठी तालुक्यात सर्रास जिलेटीनचा वापर केला जातो. जिलेटीन हे अत्यंत विध्वंसक मानले जाते. ते वापरताना कित्येक परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र श्रीगोंद्यासारख्या शहरात ते अगदी मावा-गुटखा मिळाल्यासारखे सर्रास मिळते. जिलेटीनच्या स्फोटात विहिरीतील तीन कामगारांच्या पार चिंधड्या उडाल्या. इतर तिघेही जखमी असल्याचे समजते. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर काही मोठे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. स्फोटासाठी वापरलेले जिलेटीन हे अधिकृत होते का, विहिरीचे काम करताना सदोष साहित्य वापरले होते का, विविध अधिकाऱ्यांकडून परवानग्या घेतल्या होत्या का, स्फोटाची माहिती पोलिस किंवा सक्षम अधिकाऱ्यांना होती का, विहिरीच्या कामावरील कामगारांना सुरक्षा पुरविली होती का, जिलेटीन बेकायदा असेल तर ते कुणी पुरविले, त्यामागचा मुख्य सुत्रधार कोण, जिलेटीन पुरवठादारावर ३०२ चा गुन्हा दाखल झाला का, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल का, असे कित्येक प्रश्न पडणार आहेत.

 

गेल्यावर्षी अंबानींच्या बंगल्याजवळ २० जिलेटीनच्या कांड्या सापडल्यावर पोलिस खात्यापासून गृहखातेही अँक्टीव्ह झाले होते. स्फोट होण्याआधीच गुन्हेगारांवर कारवाई झाली होती. श्रीगोंद्यात मात्र स्फोट होऊन तिघांचे प्राण गेले आहे. त्यामुळे श्रीगोंदा पोलिस नेमके कोणते गुन्हे दाखल करतात, हे पहावे लागणार आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी ही पद्धत पोलिसांनी न अवलंबिलेलीच बरी, एवढीच श्रीगोंदेकरांची माफक अपेक्षा असणार आहे. गरीब घराण्यातील तिघांचा जीव स्वस्त आहे की महाग हे गुन्हा दाखल झाल्यावर समजेल. पोलिसांनी मात्र या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

लेटेस्ट न्यूज़