आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा
श्रीगोंदे शहर, ता. 19 जून 2024
छत्रपती संभाजी महाराज यांचे शहरातील नियोजित स्मारक जागेतील अतिक्रमणांमुळे रखडले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात महसूल प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड व शंभुप्रेमींनी येथील तहसील कार्यालयासमोर रक्ताभिषेक आंदोलन केले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील जामखेड- शिक्रापूर रस्त्यालगत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. परंतु, स्मारकाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण असून ते हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप ते अतिक्रमण हटविण्यात न आल्याने स्मारकाचे काम रखडले आहे. सदर अतिक्रमण हटविण्यात महसूल प्रशासन दिरंगाई करीत
असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जागेतील अतिक्रमण हटेपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम रखडल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.
हे अतिक्रमण हटविणार होतो. मात्र, ते हटविण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठल्यानंतर तत्काळ अतिक्रमण हटविले जाईल, असे आश्वासन या वेळी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी दिले.
माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठनेते घनश्याम शेलार, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे,साजन पाचपुते,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, तालुकाध्यक्ष श्याम जरे, नाना शिंदे, यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.