स्फोट प्रकरणात पोलिसांसमोर अनेक आव्हाने, उकल करण्याचे दिव्य पेलणार?
श्रीगोंदा, ता. २० जून २०२४
जिलेटीनच्या स्फोट प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी स्फोटातील फायर ट्रॅक्टर जप्त केले, मात्र पोकलेन मशिन अजूनही पोलिस ठाण्यात आणण्यात आलेले नाही. श्रीगोंदा पोलिसांना घटनेनंतर दोन दिवस आरोपीही सापडला नाही. आता फिर्यादीत नमूद केलेले पोकलेन मशिनही सापडत नाही. गुन्ह्यात सहभागी आरोपी व मालमत्ता या सगळ्या मि. इंडिया चित्रपटातील आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
गेल्या शनिवारी तालुक्यातील टाकळीकडेवळीत विहिरीच्या कामात जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला. त्यात तीन कामगारांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले. रविवारी फिर्याद दाखल झाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांना आरोपी सापडला नाही. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला श्रीगोंदा पोलिसांकडे देण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी पोलिस कस्टडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलिस कस्टडीही दिली. मात्र या सात दिवसांत पोलिसांना गुन्ह्यातील मिशनरी, जिलेटीनचे धागेदोरे, स्फोटाचा परवाना नसल्याचे ठोस पुरावे, जिलेटीन पुरवठादाराचा शोध या सगळ्या गोष्टी शक्य होतील का, हा खरा प्रश्न आहे.
फिर्यादीत नमूद असलेले पोकलेन मशिन हे घटनास्थळावर असल्याचे समजते. मग हे पोकलेन मशिन जप्त करुन पोलिस ठाण्यात का आणले जात नाही, हे कोडे आहे. पोकलेन मशिन पोलिस ठाण्यात आणण्यासाठी इतर वाहन, ड्रायव्हर लागणार आहे. मात्र ही पूर्तताही पोलिसांकडून होत नसेल तर तपास कसा होणार, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
आरोपीकडे डिटोनरचा अजून साठा आहे का, डिटोनेटर कुणाकडून घेतले, डिटोनरच्या साखळीचा शोध, प्रशिक्षित लायसन्सधारी फायरर होता का, डिटोनेटर घटनास्थळी कोणत्या वाहनातून आले, ते कोठून आणले जातात, कोण विकतो, आरोपीच्या व्यवसायात अजून कुणी भागिदार आहेत का, हे सगळे प्रश्न पोलिस सोडवू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उकल शोधण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी सक्षम अधिकारी द्यावा, अशी मागणी सध्या तालुक्यातून होत आहे.