पराभव मान्य मात्र राजकारण नको : डॉ.सुजय विखे पाटील
शिर्डी : दि.21 जून 2024
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील ४० बूथवरील ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना अधीन राहून दिलेल्या विहित मुदतीत आपण आयोगाकडे या मागणीचा अर्ज दाखल केला आहे. यासाठी आयोगाकडे नियमाप्रमाणे १८ लाख ८८ हजार रुपयांची फी जमा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. सदरील निकाल आम्ही स्वीकारलेला आहेच. परंतु मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी आपल्या गावातून पडलेले मतदान आम्हाला मान्य नाही, किंबहुना असे होऊ शकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या मानसिक समाधानासाठी, ज्या बुथवर, ज्या गावात अशा भावना अधिक तीव्र होत्या अशा एकूण ४० बूथ वरील व्हीव्हीपॅट पुन्हा मोजण्याची मागणी आपण केली आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांचे निरसन होईल, असा मला विश्वास आहे.
पराभव मान्य, मात्र राजकारण नको
जनतेने दिलेला निकाल तेव्हाही मान्य होता, आजही आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण आणू नये. यासाठी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. जेव्हा निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून बोलावणे येईल त्या दिवशी उपस्थित राहून आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ, असे डॉ. विखे पाटील म्हणाले.