उपोषण स्थळी माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली भेट
श्रीगोंदा दि.१० ऑगस्ट २०२४
तालुक्यातील पिसोरे खांड येथे एक मोठी घटना घडली असून, ३० जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता संतोष रमेश कुदांडे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला सार्वजनिक रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणावरून झाला असून, हल्ल्याचा आरोप ९ आरोपींवर करण्यात आला आहे. या प्रकरणात, संतोष कुदांडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर दुखापत झाल्याने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पीडित कुटुंबातील लोकांनी आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाला माजी आमदार राहुल (दादा) जगताप,आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे API निकम यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांना दिलासा देताना, API निकम यांनी आरोपींच्या अटकेसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देत स्थानिक पोलीस प्रशासनाला काही वेळ कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी देण्याचे आश्वासित केले. ते पुढे म्हणाले की, “एकही आरोपी मोकाट दिसणार नाही.”
माजी आमदार राहुल जगताप यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत, पीडित कुटुंबाची भूमिका जाणून घेतली आणि पोलिसांकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. संतोष कुदांडे आणि नवनाथ कुदांडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना, “जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम पवित्रा घेतला होता.
या घटनेत आरोपींनी पीडित कुटुंबावर दगड, गज, चाकू, विळा आणि कोयत्याने हल्ला करत गंभीर दुखापत केली आहे. काही जखमी व्यक्ती सध्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे, या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन पोलिसांनी आरोपींना अटक करावी आणि पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत उपोषण चालू राहील.”
या आंदोलनाला माजी आमदार राहुल जगताप, गोपनीयचे सचिन गोरे, स्मितल भैया वाबळे, आणि विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आंदोलनात संतोष कुदांडे, गोरख इंगळे, दत्तात्रय इंगळे, रमेश कुदांडे, विश्वनाथ इंगळे, आदिनाथ कुदांडे, बाबासाहेब कुदांडे, किरण कुदांडे, भाऊसाहेब इंगळे, सोपान इंगळे, रामचंद्र इंगळे आणि पीडित कुटुंबातील बहुसंख्य नातेवाईक व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी पोलिसांनी आरोपींना चार ते पाच दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी रात्री उशिरा उपोषण थांबवले.