रात्री उशिरा पर्यंत सुनावणी सुरू
श्रीरामपूर : दि.11 ऑक्टोबर 2024
महिलेवरील अत्याचार प्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना गुरुवारी राहुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या वतीने रात्री उशिराने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती.
राहुरी तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना राहुरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली होती. त्यांना राहुरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. ते राहुरी पोलिस ठाण्यात कैद होते. बुधवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना रात्री बारा वाजेच्या सुमारासअहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना गुरुवारी पहाटे पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांच्या शिक्षेबाबत राहुरी न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.
पोलिसांच्या वतीने मुरकुटे यांना वैद्यकीय कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. मुरकुटे यांनी तपासात कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांच्या अधिक चौकशीची गरज आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हा मुद्दा मुरकुटे यांच्या वकिलांनी खोडून काढला. वैद्यकीय कोठडी हा प्रकार अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी मुरकुटे यांच्या वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मुरकुटे यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला.
त्यावर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. मुरकुटे यांच्या वतीने विधिज्ञ सुमित पाटील, महेश तवले, सुभाष चौधरी, ऋषिकेश बोर्ड हे काम पाहत आहेत.
खासगीत उपचार घेण्याची केली विनंती
■ अटकेत असलेले माजी आमदार मुरकुटे यांचा बुधवारी रात्री रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यातून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविले.
• जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब १९० वर गेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. माजी आमदार मुरकुटे यांनी नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. परंतु, ती मान्य केली नाही. नंतर गुरुवारी पहाटे त्यांना पुण्याला पाठविण्यात आले.