श्रीगोंदा पोलिसांच्या एकाच दिवशी दोन कारवाया , तब्बल 78 लाखांचा मुद्देमाल जप्त
श्रीगोंदा दि.24 डिसेंबर 2024
श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथे गावठी दारू अड्ड्यावर तसेच श्रीगोंदा शहरात. एक घरगुती गॅस घेऊन चाललेला टेम्पो पकडला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ७८ लाख २२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन कारवाईच्या पुढील सूचना केल्या. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काष्टी परिसरातील अजनूज रस्त्यालगत राहुल दामोदर बनसोडे हा रावसाहेब वामनराव पाचपुते यांच्या शेतात गावठी (हातभट्टी) दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन तयार करतो. त्या रसायनातून इतर लोकांच्या मदतीने गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा मारला. शेतामध्ये उसाच्या पिकाच्या आडोशाला रसायनापासून हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असताना विशाल रावसाहेब पाचपुते ( काष्टी) दिपू रामविलास (रा. सैदापूर, ता. सफीपूर, जि. उन्नाव, उत्तर प्रदेश), गणेश रामबालक शंकर (रा. मुठाह, ता. साफेपूर, जि. उन्नाव, रा. उत्तर प्रदेश), मनोजकुमार रामपाल सिंग (रा. खचिन खंडा, ता. साफेपूर, जि. उन्नाव, उत्तर प्रदेश) या पाच जणांना ताब्यात घेतले. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ७२हजार लिटर कच्चे रसायन, ५०० लिटर गावठी तयार दारू, दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीच्या १० गोण्या, काळा गूळ, चार चाकी वाहने असे ५१ लाख ५९ हजार ६० रुपयांचे साहित्य जप्त करीत पोलिस कॉन्स्टेबल संदीप पोपट राऊत (वय ३३) यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लिमकर, पोलिस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, मनोज साखरे, अरुण पवार, गणेश साने, योगेश भापकर, अरुणा खेडकर यांनी कारवाई केली.
टेम्पोसह १७० गॅस टाक्या पकडल्या…
दुसऱ्या प्रकरणात कुळधरण (ता. कर्जत) येथून टेम्पो भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅसच्या टाक्या घेऊन शिरुर (जि. – पुणे) येथे जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस कर्मचाऱ्यांनी श्रीगोंदा बस स्थानकावर मिळालेल्या माहितीमधील टेम्पो थांबविला. त्याच्याकडे विचारणा केली असता तो योग्य माहिती देऊ शकला नाही. वाहनात काय आहे? असे विचारले असता भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅसच्या १७० टाक्या आहेत. त्या गॅस टाक्या वाहतुकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्याला पोलिस ठाण्यात आणत २० लाख रुपये किमतीचा टेम्पो, ६ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस भरलेल्या सीलबंद १७० टाक्या जप्त केल्या. वाहन चालक किरण ज्ञानदेव भारती (रा. भांबोरा, ता. कर्जत) याच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल गोरख शिवाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.