सततच्या ढगाळ हवामानाचा फटका, उत्पादनावर परिणाम
श्रीगोंदा : दि.३० डिसेंबर 2024
तालुक्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण, पडत असलेले धुके अन् दव पिकांच्या ‘मुळावर’ आले असून कांदा व चारा पिके विविध रोगांच्या विळख्यात सापडले आहेत. थंडी मुळे गहू, हरभऱ्याची पेरण्या नुकत्याच पार पडल्या आहेत.
मागील महिन्यात परतीचा पाऊस तालुक्यात बरसला नसल्याने रब्बी पिकांना पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याअभावी गावरान कांद्याचे भवितव्य अधांतरी असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात लाल, रांगडा तसेच गावरान कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. तालुक्यात शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेतकरी कांदा पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. कांदा लागवडीच्या वेळेस असलेल्या पोषक वातावरणात अचानकपणे मागील आठवड्यात बदल झाला आहे. कांदा, मका, चारा पिके तसेच कांद्याच्या रोपांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कांदा पिकांवर डाऊनी, करपा, गाठींची सड, मावा, तुडतुडे, मर या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कांद्याच्या रोपांवर बुरशी, मर काही प्रमाणात डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो तर मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील लसून मात्र जोमात असल्याचे पहावयास मिळत आहे. दसऱ्यानंतर थोड्याफार प्रमाणात पडणाऱ्या थंडीवर तालुक्यात गहू, हरभऱ्याच्या पेरणीला झाल्या. पण तालुक्यात परतीचा पाऊस हा समाधानकारक झाला नाही परंतु काही परिसरातील अनेक तलावांनी तळ गाठलेला आहे. तर काही पट्ट्यातील तलाव पावसाळ्यात झालेल्या पावसात तुडुंब भरले होते तेही आज रोजी कमी झालेले पहावयास मिळते. परंतु,
काही पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये रब्बी पिकांबाबत ही धाकधूक वाढलेली आहे. गावरान कांदा उत्पादन बाबत पाण्याअभावी साशंकता निर्माण झाली आहे. गहू, गावरान कांद्याच्या पिकास जानेवारी महिन्यामध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता दिसून येत आहे. कुकडी कॅनल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असतो. तसेच या कॅनल मधून शेजारील बऱ्याच गावांना पाण्याचा ही पुरवठा करण्यात येत असतो. परंतु हे पाणीही वेळेत सुटले तर पिके येतात अशी चिंता शेतकरी व्यक्त करतात.
दोन एकर कांदापिकाची लागवड केली आहे. परंतु, हवामानातील बदलामुळे कांदा पिकांवर पिळ,डाऊनी, करपा, मावा,तुडतुडे व मर रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.आतापर्यंत ६० हजार रुपये खर्च केला असून उत्पन्न हातीयेईल की नाही याची शाश्वती नाही. थोडाफार कांदा आला आहे मात्र त्यात सरकारने कांद्याचे बाजार भाव कमी केले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा आर्थिक विवंचनेत सापडत आहे.
युवराज ढवळे : शेतकरी पिसोरेखांड.ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर