खांडगाव रस्त्यावर असा लावला श्रीगोंदा पोलीसांनी सापळा
श्रीगोंदा:दि 16 ऑक्टोबर 2024
श्रीगोंदा पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत विनापरवानादेशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून 7,75,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खांडगाव शिवारातील श्रीगोंदा ते मांडवगण जाणाऱ्या रस्त्यावर सुझुकी कंपनीच्या कॅरी गाडीत एक अनोळखी इसम विनापरवाना देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे आणि इतर सहकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले.
सदर पथकाने खांडगाव शिवारातील श्रीगोंदा-मांडवगण रस्त्यावर सापळा रचून, शैलेंद्र सुखदेव बोरगे (वय 52, रा. सोनेवाडी, ता. जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुझुकी कंपनीची कॅरी गाडी, ज्याची किंमत 5,00,000 रुपये आहे, आणि 2,75,460 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू असा एकूण 7,75,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल संदिप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अंतर्गत नोंदवला गेला असून, पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगावले हे करीत आहेत.
या धडक कारवाईमुळे श्रीगोंदा परिसरात विनापरवाना बेकायदा दारू विक्रेत्यांवर पोलीसांकडून कडक कारवाई सुरू असल्याचे चित्र उभे राहिले आहे.