श्रीगोंद्यात दुमदुमला हरिनामाचा गजर
श्रीगोंदा दि.19 जुलै 2024
आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्रीगोंदा येथील व्यंकटेश पोद्दार लर्न इंग्लिश मीडियमच्या बाल वारकऱ्यांनी ‘माऊली माऊली मांऊली’च्या नामघोषात संत शेख महंमद महाराजांच्या प्रांगणामध्ये बुधवारी दिंडी सोहळा भक्ती उत्सव साजरा केला.
यावेळी बाल वारकऱ्यांनी अभंग व टाळ लेझीम सादर करून भारतीय रुढी आणि परंपरा यांचे महत्त्व तसेच त्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या कारण उपस्थितांच्या लक्षात आणून देत नैतिकतेचा संदेश दिला. तसेच टाळ आणि लेझीम पथकांनी कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर (जोधपूर मारुती चौक) या ठिकाणाहून झाली, त्यासाठी विठ्ठल रुख्मिनी व श्रीगोंदा भूमीतील शेख महंमद महाराज यांच्या प्रतिमा व पादुका पूजन करण्यात आले, पूजेसाठी उपस्थित मान्यवर श्री. गोपाळराव मोटे पाटील,श्री.बंडुकाक दहातोंडे, संस्थेचे चेअरमन श्री. नवनीत मुनोत व्हा. चेअरमन श्री. अतुल बगाडे व प्राचार्य श्री. जितेंद्र वाघमारे सर यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली.
संपूर्ण श्रीगोंदा शहरामध्ये प्रदक्षिणा झाली त्यासाठी बगाडे कॉर्नर पासून मांडवगण वेस, कासार गल्ली, झेंडा चौक, रोकडोबा चौक, काळकाई चौक आणि होनराव चौकातून शनी चौक मार्गे महंमद बाबा प्रांगणामध्ये दिंडी सोहळा पोहोचला व शहर प्रदक्षिणा पूर्ण झाली.
प्रत्येक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वारकरी वेशभूषेमध्ये नृत्य व अभंग आणि लेझीम सादरीकरण केले, ठिकठिकाणी शालेय व्यवस्थापनाच्या वतीने सर्व विद्यार्थी व पालक वर्ग व इतर सांप्रदायिक क्षेत्रातील भाविकांसाठी फराळ व्यवस्था केली होती. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सर्वात शेवटी श्री. शेख महंमद बाबा यांच्या प्रांगणामध्ये आषाढी वारी निमित्ताने विविध अभंगवाणी विद्यार्थ्यांनी सादर केली आणि शेवटी संत, गोरा कुंभार यांच्या जीवनपटावरील विठ्ठल भक्तिमय प्रसंगाचे नाट्यमय सादरीकरण ७ वि च्या विद्यार्थ्यांनी केले. चेअरमन सरांच्या भाषणामध्ये त्यांनी संतांचे महत्व विशद केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आणि शेवटी फराळ/प्रसाद ग्रहणानंतर दिंडी सोहळ्याची दिमाखात सांगता झाली. या सर्व वातावरणाने श्रीगोंदा शहर भक्तीमय झाले होते.