खडतर प्रवासातुन नवदुर्गांनी कशी घेतली गगन भरारी. श्रीगोंदा:दि.२३ ऑक्टोबर २०२३.
दि.२२/१०/२०२३ रोजी ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो इंडिया, मुंबई संयोजित व सावित्री महिला समस्या नोंद निवारण केंद्र आयोजित जागर स्त्री शक्तीचा-महिला मेळावा श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो इंडिया, मुंबई संस्थेच्या वतीने तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, ढोकराई कारखाना, टाकळी लोणार व शेडगाव या गावांमध्ये प्रतिकात्मक स्वरूपाची घटस्थापना करून गेल्या ६ दिवसापासून विविध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये समतेची रॅली, समाज प्रबोधन व्याख्याने, कौटुंबिक हिंसाचार माहिती, समाजातील स्त्री जाती विषयी असलेल्या चुकीच्या रुढी-परंपरा जनजागृती, होम मिनिस्टर, स्त्री भ्रूण हत्या पथनाट्य गावागावांमध्ये सादर करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाची सांगता समारोह श्रीगोंदा या ठिकाणी श्रीम.संगीताताई पावटे यांच्या अध्यक्षतेखाली आज तीनशे महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरवात संघर्षातून स्वअस्तिव निर्माण करणाऱ्या व विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी मोटारसायकल वरून रॅली द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात प्रवेश केला.त्यांनतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन करून समाजातील जुन्या चालीरिती-परंपरा व अंधश्रद्धेचे प्रतिकात्मक होमामध्ये दहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्त्री भ्रूण हत्या हे पथनाट्य सादर करण्यात आले.त्यांनतर उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे आम्ही घडलो हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आपली संघर्षमय जीवनपट मांडून उपस्थित महिलांना प्रेरणा देण्याचे काम केले. यामध्ये प्रामुख्याने माऊली वडापाव गृहउद्योजक श्रीम.मेघाताई सरोदे यांनी महिलांनी आपल्या समोर आलेल्या संकटांना कसे सामोरे जावे हे स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले. कामगार तलाठी श्रीम.हर्षदा पोळ यांनी महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित महिलांना देऊन त्यासाठी असलेल्या नियमावली बाबत मार्गदर्शन केले.ग्रामीण विकास केंद्र जामखेड संस्थेच्या सचिव श्रीम.उमाताई अरुण जाधव यांनी या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे या बाबत माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले व ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येऊन होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुध्द लढणे काळाची गरज असल्याचे सांगितले आणि लढताना संस्था सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले.
संस्थेचे सल्लागार व मार्गदर्शक मा.प्रा.बाळासाहेब बळे सरांनी संस्थेचा गेल्या तीस वर्षा पासूनचा संघर्ष व संस्थापक अध्यक्ष Adv. डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या महिला विषयी केलेल्या संघर्षमय घडामोडी थोडक्यात मांडून महिलांच्या विविध प्रकारच्या जुन्या चालीरीती वर सडकून टीका करून हे बदलणे गरजेचे आहे त्याशिवाय महिलांची प्रगती होणे अशक्य आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या श्रीम.रुपाली मोटे, अस्मिता शेळके, श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी श्रीम.डॉ.शैला ताई डांगे, पंचायत समिती श्रीगोंदा MSRLM विभागाच्या प्रभाग समनव्यक श्रीम. अनिता काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जि. प.प्राथमिक शाळा (मुलांची), श्रीगोंदा येथील शिक्षिका श्रीम.पावटे ताई यांनी अध्यक्षीय मनोगतातून विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. यामध्ये बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या, मुलींचे शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा यामधून महिलांनी बाहेर पडून आपली प्रगती करावी व संस्थेने महिलांसाठी असे जनजागृतीचे कार्यक्रम श्रीगोंदा शहरात पुन्हा घ्यावेत अशी विंनती केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिव उमाताई जाधव, महिला सक्षमीकरण टीमच्या पल्लवी शेलार, उज्जवला मदने, लता शिंदे, सुनीता बनकर, रोहिणी राऊत, द्वारका पवार, रजनी औटी, काजोरी पवार, अर्चना भैलुमे, नंदू गाडे सर, तुकाराम शिंदे सर, सचिन भिंगारदिवे, तुकाराम पवार, राहुल पवार, नरशिंग भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी आश्विनी जगधने, साधना भोसले, पौर्णिमा कुचेकर, सुनीता, ढवळे,गायत्री ढवळे, मंगल धेंडे, कविता सिदनकर, मीना मोहिते, पल्लवी सकट, सुनीता गुजर आदी महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्जवला मदने यांनी केले तर प्रास्ताविक पल्लवी शेलार यांनी मांडले तसेच आभार प्रदर्शन सुनिता बनकर यांनी केले.