अनाधिकृत सेतू चालकांविरोधात आयुक्तांकडे निवेदन
श्रीगोंदा -दि.25 सप्टेंबर 2024
तालुक्यातील नागरिकांना शासकीय सेवा तात्काळ मिळावी यासाठी तहसिल कार्यालयाच्या परिसरात चार सेतू केंद्रांना परवानगी देण्यात आली असताना, काहींनी राजकीय बळाचा वापर करून बाहेरगावी असणारे केंद्र तहसिल कार्यालयाच्या समोर आणून स्वतःचे दुकान थाटले. अशा १५-२० सीएससी सेतू केंद्रचालकांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराज पळसकर यांनी राज्यसेवा हक्क आयोग नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरीपंचने वेळोवेळी शहरात अनाधिकृत सेतू बाबत आवाज उठवला व यामुळे अनेक सेतू चालकांचे धाबेही दणाणले. परंतु नेहमीप्रमाणे सेतू विरोधातील तक्रारी काही कमी होताना दिसत नाहीत. नगरीपंचच्या वृत्ताची दखल घेत नायब तहसिलदार अमोल बन यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी शहरतील सीएससी सेतू केंद्रात जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता तब्बल १५-२० केंद्र श्रीगोंदा शहरामध्ये बेकायदेशीरपणे अनधिकृत सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गुरुवार दि. १९ रोजी राज्यसेवा हक्क आयोग नाशिकच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी पथकासह सीएससी सेतू केंद्रचालकांची तपासणी केली. यावेळी बोगसपणे सुरु असलेल्या केंद्रचालकांनी कारवाई टाळण्यासाठी दरवेळेप्रमाणे पळ काढला.
तालुक्यातील नागरिक शाळेसाठी लागणारे दाखले व रेशनकार्ड काढण्यासाठी येत असताना त्यांची आर्थिक लुट होवू नये यासाठी सेतू केंद्र सुरु करण्यात आले. मात्र तालुक्याच्या कामाचा आवाका मोठा असल्याने तहसिल कार्यालयातील काहीं अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि राजकीय वरदहस्त मिळवत, नेमुन दिलेल्या ठिकाणी सीएससी सेतू केंद्र सुरु न करता बेकायदेशीरपणे अनधिकृत श्रीगोंदा शहरामध्ये केंद्र सुरु केले. तसेच काही सीएससी चालकांनी स्वतःचा महाऑनलाईनचा आयडी वेगवेगळ्या गावामध्ये भाड्याने दिला असून ते दाखल्याच्या पीडीएफमध्ये फेरबदल करून दुब्लीकेट दाखले वितरीत करत आहेत. अशा केंद्रात आणि तहसील कार्यालयात हेलपाटे मारूनही काम होत नाही. तसेच पुरवठा विभागातून नवीन, विभक्त, दुबार शिधापत्रिका मिळणेकामी अर्ज सेतु तसेच ऑनलाईन कॉम्प्युटर सेंटरमधून ऑनलाईन करण्याबाबत सूचना द्याव्यात. ऑनलाईन रेशनकार्ड तातडीने मिळण्यासाठी तहसिल कार्यालयात ऑपरेटरची संख्या वाढवावी. तसेच बोगस केंद्रचालकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य आयुक्त कुलकर्णी यांना पळसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
—– चौकट —–
नेहमीप्रमाणे अधिकारी यावेळी सेतू चालकांना पाठीशी घालणार नाहीत अशी अपेक्षा श्रीगोंदेकरांनी केली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात या अनाधिकृत सेतू चालकांवर कारवाई न केल्यास काही नागरिक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहेत.
क्रमशः (10)