खासदार सुजय विखेंचा लंकेंना नाव न घेता टोला
राहुरी दि.14 जानेवारी 2024
अहमदनगर जिल्ह्यात आगामी लोकसभेच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. खा. सुजय विखे यांनी जबरदस्त मोर्चे बांधणी करत सर्वच मातब्बरांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केलेत.परंतु आ. लंके मात्र महायुतीत असूनही विखे यांचे कट्टर वैरत्व घेताना दिसत आहेत.
दोघांमध्ये राजकीय वादंग सुरूच असून आता पुन्हा एकदा खा. सुजय विखे यांनी आ. लंके यांचे नाव न घेता टोलवाटोलवी केली आहे. आम्ही समाजाचे देणे लागतो, या दृष्टिकोनातून काम करतो. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलेच काम करत नाही.
आमच्यावर टिका करणाऱ्यांना देखील आम्ही महत्त्व देत नसल्याचा टोला विखे यांनी लंके यांना नाव न घेता लगावला आहे. राणी लंके यांनी राहुरीत जी टीका केली होती त्यावर बोलताना त्यांनी प्रतिउत्तर दिले.
काय म्हणाल्या होत्या राणी लंके
शुक्रवारी स्वराज्य यात्रेनिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी राहुरीत आल्या होत्या. त्यांनी यावेळी खा. विखे यांच्यावर साखर व दाळ वाटपाचा कार्यक्रम अगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे, कुणी काही वाटो जनतेच्या मनात आम्हीच आहोत असा घणाघात नाव न घेता केला होता.
राहुरीत साखर व डाळ वाटप
राहुरी शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन तसेच २२ जानेवारीला आयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त खासदार डॉ. विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वतीने सामान्य शिधापत्रिका धारकांना चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी आ. शिवाजी कर्डीले देखील उपस्थित होते. यावेळी माजी आमदार कर्डिले म्हणाले, महिन्याभरापूर्वी नगर जिल्ह्यातील नागरिकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडवून आणण्याचे काम केले होते.
राहुरी शहरातील साखर व दाळ वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले आहेत. आयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त साखर व हरभरा दाळीचे वाटप सुरू आहे. २२ तारखेला साखर व दाळीचा गोड नैवेद्य तयार करण्यात यावा असे आवाहनही त्यांनी केले.