विकासाच्या विविध कामाचे खासदार सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते उद्घाटन
श्रीगोंदा दि.17 जानेवारी2024
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यामध्ये नगरचे खासदार सुजय विखे पाटील मागे नाहीत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने मतदारसंघात आयोजित कार्यक्रमांना खासदार विखे हजेरी लावत आहेत.
यातून केलेल्या विकास कामांचा पाढाच ते वाचून दाखवत आहेत. विकास कामे कशी मार्गी लावली याची विस्तृत माहिती देत आगामी निवडणुकीच्या दृष्टिने मतपेरणी करत आहेत.
श्रीगोंद्यात साकळाई योजना आणि विसापूर प्रकल्पाला पाणी सोडण्याची, तर राहुरीकरांना वांबोरी चारीचा वीजबिलाची सवलतीची माहिती देत खासदार सुजय विखेंनी उपस्थितांना सुखद धक्का दिला. खासदार विखेंचा हा सुखद धक्का किती भावला हे निवडणुकीच्या निकालानंतर कळून येईलच.
श्रीगोंद्यात मांडवगण येथील कार्यक्रमात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी साकळाई जलसिंचन योजना सर्व्हेच्या रूपात प्रत्यक्षात आणल्याची माहिती दिली. या योजनेच्या सर्व्हेसाठी प्रत्यक्षात ६० लाख रुपये वर्ग केले. सर्व्हेचे काम पूर्ण झाले असून, 794 कोटी रुपयांची ही योजना होत आहे. ही योजना दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. फेब्रुवारी माहिन्यात या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.
कुकडीचे आवर्तन सुरू आहे. कुकडीतून विसापूर प्रकल्पात 21 जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे खासदार विखे यांनी सांगितले. विसापूर प्रकल्पात 21 ते 23 जानेवारीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. सुमारे ३०० दशलक्ष घनफूट विसापूर प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव पिसा, घारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, चिंभळे, पिसोरे, येळपणे या गावातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.
वांबोरी चारीचे 25 लाख रुपयांचे वीजबिल थकले होते. हे थकीत वीजबिल महावितरणकडे वर्ग केल्याची माहिती खासदार विखे यांनी दिली. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. वांबोरी चारीचे तीन पंप चालू असले, तर सुमारे 1 कोटीच्या आसपास महिन्याचे वीजबिल येते. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या सरकार निर्णय 22 ऑगस्ट 2023 नुसार अतिउच्च दाब, उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेंतर्गत ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यास सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार वांबोरी चारीचे दोन महिन्याच्या वीज बिलामध्ये एकूण 1 कोटी नऊ लाख, 75 हजार 945 कोटी इतकी सबसिडी सरकार दिली आहे.
या सबसिडीमुळे नोव्हेंबर महिन्याचे चालू बिल 11 लाख तीन हजार 774 रुपये व डिसेंबर महिन्याचे चालू बिल 23 लाख 94 हजार 180 रुपये इतके कमी झाले आहे. गोदावरी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीचे चालू विद्युत देयक भरण्यासाठी 25 लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे वांबोरी चारीचे महावितरणकडून तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्यात आल्याचे खासदार विखेंनी सांगितले.