मीच त्याला राष्ट्रवादीत आणलं, पण तो बदलला :अजित पवार
पारनेर दि.19 ऑक्टोबर 2024
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि काही पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी भाषणात बोलताना खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
मागच्या काळात निलेश लंकेला मीच राष्ट्रवादीत घेतलं. पण माणसं महत्वाच्या पदावर गेल्यावर बदलतात. तसा निलेश बदलला, असं म्हणत अजित पवारांनी खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली. सोबतच निलेश लंकेच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकटीने पारनेरचे वाटोळे केलं, असं अजित पवार म्हणाले.
सुपा एमएडीसीचे अनेक कारखाने यायला तयार आहेत. फक्त वातावरण चांगले ठेवा. तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मी सोडवून देईल, पण मी जो उमेदवार देईल त्याला साथ द्या. गाफील राहू नका, भावनिक होऊ नका, असा सल्ला देखील अजित पवारांनी उपस्थित पारनेरकरांना दिला.
दरम्यान, अजित पवारांचे भाषण सुरू असताना ‘पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या’, असं म्हणत अजित पवारांच्या सभेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर आणि कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवले आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावले आणि “तुम्हाला लंकेंनी पाठवले आहे का?” असा सवाल केला.