जय यांना बारामतीतून तिकिटाची चिन्हे
बारामती दि 16 ऑगस्ट 2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र जय पवार हे निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय तर्कवितकांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी कर्जत- जामखेडमधून रोहित पवार यांच्या समोर उभे राहावे, याबाबत पक्षात गांभीर्याने विचार सुरू आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही चूक असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे विधानसभेला शरद पवार व अजित पवार यांच्यात दिलजमाईबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र बारामती विधानसभेत जय पवार यांना उमेदवारी मिळावी, अशी कार्यकत्यांची इच्छा असेल, तर संसदीय मंडळ निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती विधानसभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. बारामतीत लोकसभेला ताई व विधानसभेला दादा असे मतदार उघड बोलत असल्याने, विधानसभेचा निकाल लोकसभेसारखाच लागेल, याची खात्री नव्हती. अशातच जय पवार यांच्याबाबत संदिग्ध विधानामुळे पवार कुटुंबातील स्पर्धा कटुतेकडे जाणार का, अशी चर्चा आहे.
दुसरीकडे कर्जत-जामखेड मध्ये मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्या विजयामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. या बहुतांश दुष्काळी मतदारसंघात अजित पवार व रोहित पवार यांचे खासगी साखर कारखाने चांगले चालत असल्याने काही पट्ट्यांमध्ये सधनता आहे. लोकसंख्येत सर्वाधिक मराठा समाज, त्या खालोखाल दलित, धनगर व माळी समाज आहे. मराठा- दलित संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या मतदारसंघात जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव आहे. अशा वेळी अजित पवार जोखीम पत्करतील का, असाही प्रश्न आहे.