रोहित पवारांचा अजित दादांना थेट इशारा
कर्जत दि.16 डिसेंबर 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या जोरदार पाठपुरावा केला होता.महाविकास आघाडी सरकारच्या काळासह महायुती सरकारच्या काळातही त्यांनी एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता.पण आता रोहित पवार यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या एमआयडीसीला स्थगिती मिळाली आहे.यावरुन भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता कर्जत जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) वरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना रोहित पवारांनी थेट इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेड एमआयडीसीबाबत प्रतिक्रिया देतानाच राम शिंदे साहेब सांगतील, त्याच पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे विधान केले होते. या त्यांच्या विधानामुळे रोहित पवार यांची चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा आहे. पण आता थेट अजित पवारांनाच इशारा देतानाच राम शिंदे हे सांगतील त्याप्रमाणे व्हावं,पण निर्णय चुकला तर मात्र आम्ही शांत बसणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजितदादांनी राम शिंदे म्हणतील तसंच करावं,पण 1000 एकरापेक्षा कमी एमआयडीसी नको हे माझं मत आहे. एमआयडीसी करताना इतर प्रश्न देखील मार्गी लावा ही विनंती आहे.आम्ही जी जागा सूचवली आहे ती फॉरेस्ट आणि इतर गोष्टींपासून दूर आहे.त्या ठिकाणी मोठे उद्योग उभे राहू शकतात,गोडावून तयार होऊ शकतात असेही ते म्हणाले.
तसेच त्याठिकाणी जर फक्त गोडाऊन्स उभे राहिले आणि कारखाने दुसरीकडे असतील तर जास्त लोकांना रोजगार देता येणार नाही. अजितदादा याबाबतीत लक्ष घालतील. पण सरकारचा निर्णय जर चुकला तर आम्ही शांत बसणार नसणार असल्याचा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला.
याचवेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर प्रदेश, गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पण महाराष्ट्रात गुंतवणूक खूप कमी झाली अशी टीकाही केली.राज्यात केवळ 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे असा डेटा सांगतो. पुढील आठवड्यात चर्चा नाही झाली तर लोकांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला