अजितदादांच्या उपस्थितीत नागवडे कारखान्यावर कार्यक्रम, अनेकांच्या भुवया उंचावल्या
श्रीगोंदा दि.2 जानेवारी 2024
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार १९ जानेवारीला श्रीगोंद्यात येणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नुकतीच मुंबईत अजितदादांची भेट घेत कौटुंबिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. काँग्रेसचे पदाधिकारी असणाऱ्या नागवडे कुटुंबाकडे अजितदादा येणार असल्याने तालुक्यात एकच चर्चा सुरु झाल्या आहेत. नागवडे अजितदादा गटात जाणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंद्यात दि. १९ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. याबाबत नगरीपंचने राजेंद्र दादा नागवडे यांच्याशी संपर्क साधला असता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले असून, ते या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती राजेंद्र दादा नागवडे यांनी नगरीपंचशी बोलताना दिली. या भेटीत तालुक्यातील राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा झाल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे सहाजिकच नागवडे अजितदादा गटात प्रवेश करणार का, याबाबतच्या चर्चा तालुक्यात सुरु झाल्या आहेत. दरम्यान राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडे अनुक्रमे काँग्रेस व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
अजितदादा सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. जागावाटपात ही जागा भाजपकडे आहे. नागवडे यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यामुळे अजितदादांच्या श्रीगोंद्यातील एन्ट्रीने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांची तालुक्यातील उपस्थिती नव्या राजकीय बदलांची समीकरणे ठरणार का? या बाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १) राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या अतिथीगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत याबाबत माहिती दिली. या बैठकीला नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सुरेश लोखंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे, आदेश नागवडे, योगेश भोईटे, महेश जंगले आदी उपस्थित असल्याचे समजते.