शहराच्या विकासासाठी नगरकरांनो मला दिली तशीच ‘सुवर्णा’ला साथ द्या
नगर – नगरकरांनी जे प्रेम, आशिर्वाद मला दिले तसेच ते सुवर्णाला ही देतील व शहराला पहिल्या महिला आमदार करतील ही मला खात्री आहे. अशी पोस्ट माजी महापौर संदीप कोतकर यांनी बुधवारी (दि.३०) फेसबुक वर शेअर करत विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा पक्का असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्या आता माघार न घेता निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.
माजी महापौर संदीप कोतकर यांची फेसबुक पोस्ट जशी ज्या तशी…
सावली कधीच साथ सोडत नाही. प्रिय नगरकरानों काही कारणास्तव मी स्वतः निवडणूक लढवत नसताना नगरकरांसाठी बदल तर झालाच पाहिजे जो एक विकासाच्या राजमार्गावर घेऊन जाईल. आपल्या आजूबाजूचे नाशिक, पुणे यांनी केवढा मोठा विकास केला आणि आपण हा बॅकलॉग भरून काढायचा आपल्या विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुक लढवायची ठरवले.
काही तांत्रिक कारणांमुळे मी लढवत नाही तर कोण ही जबाबदारी लीलया पार पाडू शकेल असा विचार मी आणि माझे सहकारी करत असताना माझी पत्नी सुवर्णाचे नाव सर्वानुमते पुढें आले, तिने या आधी शहराचे उपमहापौर पद भूषविले असल्याने तिला प्रशासनाचा अनुभव आहे आणि संघर्षाची तयारी आहे.
चांगल्या काळात तर सगळेच साथ देतात पण काळ कसाही असू दे सावली कधीच साथ सोडत नाही. तसेच सुवर्णा ने प्रत्येक वेळी खंबीरपणे मला साथ दिली म्हणूनच मला विश्वास आहे की नगर विकासाचे जे माझे स्वप्न आहे ती चांगल्या पद्धतीने प्रत्यक्षात उतरवील. नगरकरानी जे प्रेम, आशिर्वाद मला दिले तसेच ते सुवर्णाला ही देतील व शहराला पहिल्या महिला आमदार करतील ही मला खात्री आहे.
आपलाच – संदीप भानुदास कोतकर मा. महापौर