सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्य करण्याची मागणी
श्रीगोंदा, दि.13 जानेवारी 2025
प्रशासनातील पारदर्शकतेसाठी शासन सेवत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे कामाला दांडी मारणाऱ्या किंवा कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसला. मात्र, बाहेर काम करणाऱ्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक अनिवार्य नाही. त्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या मंडल अधिकारी, तलाठ्यांचाही समावेश होता. रेशन घेताना बायोमॅट्रीक आवश्यक आहे, तर सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी का नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
तलाठी गावात दिसत नाही, तलाठी जास्त वेळ आपल्या कार्यालयात (सज्जा) बसत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांकडून येतात. तलाठ्यांकडून कागदपत्रे न मिळाल्यास नागरिकांची महसूल विषयक कामेच ठप्प होतात.
नोकरीसाठी, शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजनांसाठी सरकारी दाखले आवश्यक असतात. त्यासाठी नागरिक तलाठी कार्यालयात येत असतात. मात्र, तलाठी कार्यालयात थांबत नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत.
महसूल विभागाचे अनेक कर्मचारी फिल्डवर काम करतात. त्यामुळे त्यांना बायोमॅट्रीक अनिवार्य करण्यात आलेली नाही. असे प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. मात्र, मुळात तंत्रज्ञान वेगात बदलत असून फिल्डवरील कर्मचाऱ्यांना देखील पारदर्शकतेच्या अनुषंगाने बायोमॅट्रीक किंवा इतर माध्यमातून हजेरी घेणे अवघड नाही. असे तज्ञांचे म्हणणे आहे.
दुपारीच कर्मचारी होतात गायब
बायोमॅट्रीक हजेरी नसल्याने अनेक कर्मचारी दुपारीच कार्यालयाच्या बाहेर जातात. मंडल अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात जात असल्याचे कारण देत काही तलाठी गायब होतात. शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला. त्या बदल्यात त्यांच्या कामाचे तास वाढविण्यात आले. मात्र, पाच दिवसांच्या आठवड्याचा उपभोग घेत काही शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नाही. त्यातही चालढकल करतात. अशी वृत्ती काही तलाठ्यांतही असल्याचे दिसून येते.
ही नागरिकांची फसवणूक
नागरिकांच्या सेवेसाठी शासकीय कर्मचारी नेमलेले असतात. त्यांना नागरिकांच्या कररुपी पैशातून पगार दिला जातो. ते शासनाचे नोकर असले तरी लोकांचे सेवक असतात. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची हजेरी न घेता, त्यांना भले मोठे पगार दिले जातात. शिवाय आठवड्यातील पाच दिवसच ते काम करतात. त्यातही प्रामाणिकपणा नाही. अशा कर्मचाऱ्यांना वेतन देणे, म्हणजे एक प्रकारे नागरिकांची फसवणूक आहे. असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकट
सकाळी कामाची वेळ न पाळणारे अधिकारी व कर्मचारी संध्याकाळी मात्र चोख वेळेतच कार्यालयाच्या बाहेर पडतात. वेळ झाल्यावर कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असतानाही हे कर्मचारी निर्धास्त कार्यालय सोडून जातात. याबद्दल एका प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वतः स्पष्ट केले की काही प्रोटोकॉल असतो की नाही. यावरून हेच दिसून येते की येतानाची वेळ नियमात नसली तरी घरी जाताना ची वेळ मात्र नियमातच हवी. अशी अवस्था सध्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच कार्यालयात आहे.