शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ?
शिर्डी दि.18 एप्रिल 2024
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मोठा धक्का दिला आहे.
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसला राम राम करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी त्यांचा 17 एप्रिल रोजी प्रवेश झाला.
उत्कर्षा रूपवते यांच्यासोबत सहकाऱ्यांनी देखील काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात तर दिवंगत नेत प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत. तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या त्या निकटवर्तीय आहेत. रुपवतेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने शिर्डीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची होती. उत्कर्षा रूपवते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होत्या, मात्र शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्याने त्या नाराज होत्या. यानंतर आता उत्कर्षा रुपवतेंनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे