दिल्लीत आज महत्वाची होणार बैठक
दिल्ली दि.16 जानेवारी 2024
राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात जोर- बैठका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली असून भाजप लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील भाजप, शिंदे , अजित पवार गटाची महायुती कामाला लागली आहे. अशातच महायुतीच्या (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून भाजप राज्यामध्ये ३२ लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
तसेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला १६ जागा मिळणार आहेत. ज्यामध्ये शिंदे गट १० जागा तर अजित पवार गट सहा जागा लढवणार आहे. आज (मंगळवार, १६ जानेवारी) भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीमध्ये महत्वाची महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपच्या या ३२ लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. आजच्या दिल्लीच्या बैठकीत याबद्दलचीही नावे समोर येण्याची शक्यता आहे.