काय..? सेतू परवाना एकाचा, अन् चालवतोय दुसराच…
श्रीगोंदा :दि.22 ऑगस्ट 2024
महा-ई-सेवा केंद्राला परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी केंद्रांचे कामकाज व्यवस्थित होत नसल्याचे वृत्त नगरीपंचने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे, सेतू कार्यालयात होणारी नागरिक व विद्यार्थ्यांची लूट, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरील सेतू श्रीगोंदा तहसील समोर मोठ्या दिमाखात थाटले आहे आहेत, सेतू एकाचा आणि चालवतोय दुसराच, अशा अनेक गोष्टी ‘नगरी पंचने’ प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या नंतर, तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी तातडीने सेतू चालकांना नोटीस काढत, तातडीची आढावा बैठक बोलावली. त्यामुळे तालुक्यातील बोगस महा ई- सेवा केंद्र चालकांना चाप बसणार हे मात्र नक्की.
श्रीगोंदा शहरात ३०च्या वर सेतू कार्यालय असून यातील फक्त सहाच सेतू कार्यालय अधिकृत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. नगरीपंचच्या वृत्तानंतर व तहसीलदार यांच्या बैठकीदरम्यान अनेक सेतू चालकांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. त्याचे कारण असे की, सेतू केंद्राचा परवाना एकाच्या नावावर आणि चालवणारा दुसराच असल्याचे समजले. दुसरीकडे नागरिकांकडून जादा पैसे घेणे, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेणे, असे प्रकार तालुक्यात घडत असून, यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यामुळे बैठकीत नेमकं काय होणार याचाही घोर सेतू चालकांना लागला असावा.
अनेक ग्रामपंचायतींना दिलेले सेतू कार्यालय हे जादा पैशाचे आमिषाने अनेकांनी खाजगी लोकांना चालवायला दिले असल्याची बाब नगरीपंचच्या स्टिंग मध्ये समोर आली असून, याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार वाघमारे यांनी दिले.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहोचविण्यासाठी आपले सरकार महा ई सेवा केंद्र, शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर सुरु केलेली केंद्रे आहेत. महा ई सेवा केंद्र याचे स्थापन तसेच नियंत्रण करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे. दरम्यान जिल्ह्यातील महा-ई सेवा केंद्र धारक शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कामकाज करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच संबंधीत महा-ई-सेवा केंद्र धारकास ज्या ठिकाणी केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आली, त्या ठिकाणी ते सेतू कार्यालय नसून ज्यादा पैशाच्या आमिषाने अनेकांनी खाजगी लोकांना चालवायला दिले, असल्याची बाब उघड झाली आहे.सेतू केंद्रात आजही दर्शनी भागात सेतू चालकाचे नाव, ऑपरेटरचे नाव व शासनाचे कागदपत्रे काढण्यासाठी दिलेले दर दिसत नाहीत. तशा सूचना तहसीलदारांनी सेतू चालकांना द्याव्यात अशी मागणी वारंवार नागरिकांमधून होत होती.
ग्रामपंचायत स्तरावर दिलेले सेतू शहरी ठिकाणी असल्यामुळे गावोगावी या सेतू चालकांचे एजंट कनेक्शन आहे. शेतकरी आपल्या शेतीच्या कामातून वेळ काढून शहरी ठिकाणी जाण्यापेक्षा गावात असलेल्या एजंटला एका दाखल्यासाठी चारशे ते पाचशे रुपये द्यायला तयार होतो व आपले काम करून घेतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु सरकारने दिलेल्या नियमानुसार हे सेतू जर गाव पातळीवर असतील तर त्या शेतकऱ्याचे कष्ट आणि पैसा नक्कीच वाचेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने नगरीपंचशी बोलताना दिली. त्यामुळे आपले महा-ई-सेवा केंद्र,(सेतू ) ज्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे, त्याच ठिकाणी कामकाज करणे बंधनकारक आहे. त्यानुसार हे गावोगावी दिलेले सेतू परवाना दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावेत. अशी सक्ती तहसीलदार यांनी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
चौकट १
यासंदर्भात तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, वारंवार सेतू चालकांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारीनुसार आपण काल सेतू चालकांची तातडीने मीटिंग बोलावत तक्रारीच्या अनुषंगाने नोटीस काढण्याच्या सूचना दिल्या आहेत जर यापुढे तक्रारी आल्या तर त्याची तात्काळ गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल व स्थलांतरित सेतू चालकांनी ज्या ठिकाणी सेतू अधिकृत परवाना आहे त्याच ठिकाणी सात दिवसात आपले सेतू स्थलांतरित करावेत, सेतू ज्या ठिकाणावर आहेत ते पाहण्यासाठी नायब तहसीलदार यांच्यामार्फत तपासणी करून सेतू त्या ठिकाणी नाही दिसला तर, पुन्हा त्या सेतूवर कारवाई केली जाईल, अशा कडक सूचना तहसीलदार वाघमारे यांच्याकडून सेतू चालकांना देण्यात आल्या आहेत. तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी तात्काळ बोलावलेल्या बैठकी बद्दल व त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तालुक्यात सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे.
चौकट २
परवाना एकाचा अन् चालवतोय दुसराच…
नगरीपंचच्या स्टिंग मध्ये परवाना एकाचा आणि चालक दुसराच अशी धक्कादायक बाब उघड झाली, याबाबत नगरीपंच लवकरच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मा. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचीही भेट घेणार आहे. याचबरोबर या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन तहसीलदार वाघमारे यांनी नगरी पंचशी बोलताना दिले आहे.