अजित पवारांनंतर रोहित पवारांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल…
नागपुर दि.10 डिसेंबर 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणाऱ्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आता शाब्दिक चकमकी सुरू आहेत. सत्तेतील अजित पवार गटाकडून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर निशाणा साधला जात आहे.
अजित पवारांनंतर छगन भुजबळ यांनीही रोहित पवारांवर टीका केली. याला रोहित पवार यांनी उत्तर दिले असून छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात दंग असल्याचा हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. छगन भुजबळ यांनी ज्या युट्यूबरचा दाखला देत रोहित पवार यांच्यावर हल्ला केला होता त्याच युट्यूबरने भुजबळ सत्तेत नव्हते तेव्हा त्यांच्यावरही जहरी टीका केली होती. याचेच हे स्क्रिनशॉट आहेत. याचा दाखला देत रोहित पवार यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
आपणास अजून आपल्याला नव्या सहकाऱ्यांचं खरं रूप कळलेलं दिसत नाही. त्यामुळं स्क्रिप्ट वाचताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. याच युट्यूबरने सत्तेत जाण्यापूर्वी आपल्यावरही असेच बदनामी करणारे अनेक व्हिडीओ केले आहेत आणि त्यातील काही स्क्रीन शॉट इथं शेअर करत आहे. आपण ते व्हिडीओ एकदा जरूर बघावेत. त्यानंतर कदाचित आपण भाजपच्या स्क्रिप्ट वाचताना नक्की काळजी घ्याल, हा विश्वास आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी भुजबळांना लगावला.