गोड ऊसाची कडू कहाणी: मुलेही शिक्षणापासून वंचित
श्रीगोंदा दि.6 फेब्रुवारी 2025
तालुक्यातील भीमा नदी, घोड कुकडी पट्ट्यातील ऊस उत्पादन अधिक असल्याने तालुक्यात ३ साखर कारखाने चालू आहेत. परंतु या ऊसतोड कामगारांना निवास, त्यांच्या लहान मुलांना शाळा व सुरक्षिततेची साधने अशा कुठलीही सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कामगारांचे संघर्षमय जीवन सुरूच आहे. निसर्गाची नेहमीच अवकृपा असलेल्या मराठवाड्यातील अनेक मजूर कुटुंबासह ऊस तोडणी साठी पर जिल्ह्यात जात असतात. कारखान्याच्या आवारात अथवा ज्या भागात ऊस तोडणी सुरू आहे.
अशा ठिकाणी आपली झोपडी उभारून तात्पुरता संसार थाटतात. ऊस तोडणी साठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे काम सुरू असते. या वेदनादायी संघर्षमय परिस्थितीतच कामगारांचा दिवस व्यतित होत असतो. कारण त्यांचा थंडीतही भल्या पहाटे दिवस सुरू होतो. यावर्षीची घेतलेली उचल फिटते की नाही फिटते तर पुढील वर्षाची उचल अगोदरच घेऊन त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. सहा महिने गावी तर सहा महिने कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होते. अनेक विद्यार्थी यात शाळाबाह्य होतात. थंडीच्या दिवसात तर कामगारांची सुरक्षा ही रामभरोसेच असते. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार? त्यांच्या व्यथा कोण जाणून घेणार? हा प्रश्न आजही प्रलंबित आहे.
ऊसतोडणी साठी ऊसतोड मजूर घरादारासह राज्य, जिल्हा सोडून मोठ्या संख्येने परगावी स्थायिक होतात. त्यांच्या लहान मुलांचे बालपण ही आई-वडिलांप्रमाणे उसाच्या फडावर जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या ऊसतोड मजुरांची मुले ही शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर अशा मराठवाड्यातील अनेक ठिकाणावरून येथे अनेक ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासह ऊस तोडणीसाठी आले आहेत. तालुक्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या देखील मोठी आहे. ऊसतोड मजूर पती-पत्नी दोघेही ऊस तोडणीचे काम करत असल्याने त्यांचे लहान मुलेही आई-वडिलांसोबत भल्या पहाटे उसाच्या शेतात जातात. ऊस तोडणीचे काम करत असताना हीच लहान निरागस बालके आपले बालपण या उसाच्या शेतात घालवितात. विशेष म्हणजे ही मुले बालवाडी सह प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतात. आई-वडिलाप्रमाणेच ही बालके आपल्या जीवाला झेपतील अशी छोटी मोठी कामे लहान वयातच सुरू करतात. आपले विश्वच बैल, गाडी ऊस, असल्याचे लहानपणी त्यांच्या मनावर बिंबवले जाते.
मुले शाळेत जात नाहीत आम्हालाही खंत वाटते
गावात किंवा रस्त्याच्या कडेला आमची राहण्याची सोय केली जाते. शाळेत इनशर्ट टाय आणि सूट-बुटातील विद्यार्थी पाहून आमची ही मुलेही अचंबित होतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मन आतून तुटते, मात्र त्यांना एकटे सोडून आम्ही कामावरही जाऊ शकत नाही याची खंत वाटते, शाळा सुटल्यावर आम्ही घरी जाईपर्यंत ते घरी एकटेच राहतील. त्यांच्या सुरक्षितेची भीती वाटते त्यामुळे त्यांना आमच्या सोबत घेऊन येत असल्याची प्रतिक्रिया एका ऊसतोड मजूर महिलेने दिली.