ताज्या बातम्याअग्निपंखच्या उपक्रमातून रायरेश्वर गडावरील ज्ञानमंदिरात दीपोत्सव...

अग्निपंखच्या उपक्रमातून रायरेश्वर गडावरील ज्ञानमंदिरात दीपोत्सव…

spot_img
spot_img

ग्रामस्थांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या श्रमदानातून 75 दिवसात शाळा इमारत पूर्ण,26 नोव्हेंबरला लोकार्पण

श्रीगोंदा दि 16 नोव्हेंबर 2023

श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या पुणे जिल्ह्य़ातील रायरेश्वर गडावर श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने श्री छत्रपतींना सलाम उपक्रम अंतर्गत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी इमारत बांधली व सर्व सुविधा युक्त सौर ऊर्जावर डिजीटल केली आहे . या ज्ञानमंदीराचे लोकार्पण रविवार दि 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा करण्यात येणार आहे. या मंदीरात प्रथमच ज्ञानाचा दिपोत्सव साजरा होत आहे.

या शाळा इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन व आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता बाबर भोसले आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण भुषविणार आहेत. सकाळी 10 वा. समाज प्रबोधनकार गणेश शिंदे यांचे प्रवचन होणार आहे.

श्री .छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले हे रायरेश्वर गड हे समुद्र सपाटीपासून १ हजार ३७६ मीटर उंचीवर आहे .येथील जंगम बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुणे जिल्हा परिषदेने सन १९६७ पासुन प्राथमिक शाळा सुरू केली पण नैसर्गीक परिस्थिती मुळे पक्की शाळेला इमारत बांधता आली नाही. कधी शाळा भवानी माता मंदीरात तर शाळा कुणाच्या घरात भरायची अशी परिस्थिती होती.

रायरेश्वर ग्रामस्थांनी अनेक समस्यांना तोंड देत लोकसहभागातून सन २००५ ला दगड मातीची कौलारू इमारत बांधली. पण अवघ्या तीन वर्षात ही इमारत जमीनदोस्त झाली. पुन्हा लेकरांचा वनवास सुरु झाला .
श्री छत्रपतींना सलाम उपक्रम अंतर्गत शिवरायांच्या या लेकरांना हक्काचा निवारा मिळावा आणि रायरेश्वर गडावर ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत राहावी .या भावनेने श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने सर्व सुविधा युक्त ज्ञानमंदीर उभारण्याचा संकल्प केला.

हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी दानशूर व्यक्ती ,संस्था आणि श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थी, गुरुजनांनी योगदान दिले यामध्ये सर्वाधिक मदत इंद्रायणी बालन फौंडेशन ( पुणे) यांनी केली आणि रायरेश्वर गडावरील बहादुर ग्रामस्थांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या श्रमदानातून हे ज्ञानमंदीर अवघ्या 75 दिवसात उभे केले आहे

चौकट
भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणेने अग्नीपंख फौंडेशन शाळा विद्यार्थी खेळाडू व भारतीय जवान केंद्रबिंदू काम करीत आहे श्री. छत्रपतींना सलाम उपक्रम अंतर्गत हिंदवी स्वराज्याची संकल्प भुमी असलेल्या रायरेश्वर गडावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत उभी करण्याचे भाग्य लाभले. सर्व दाते व गडावर बांधकाम साहित्य नेणाऱ्या जंगम बंधूंना सलाम.
गणेश डोईफोडे, उपाध्यक्ष अग्नीपंख फौंडेशन श्रीगोंदा

चौकट
रायरेश्वर गडावरील शाळेला इमारत नव्हती अनेकांनी आश्वासने दिली पण काहीच फायदा झाला नाही परंतु श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने अवघ्या पावणे तीन महिन्यात इमारत बांधकाम पुर्ण केले आमच्या स्वप्नात देखील नव्हत्या अशा सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामुळे आमच्या लेकरांना निवारा मिळाला मोठी समाधानाची बाब आहे.
सोमनाथ जंगम, रायरेश्वर

चौकट
शाळेतील सुविधा
सौर ऊर्जा सिस्टीम
डिजीटल सिस्टीम, डिजीटल साऊंड सिस्टीम,
दोन ग्रंथालये इ लर्निग, अंतर्गत सजावट, खेळाडुंचे फ्लेक्स विद्युत रोषणाई, संगणक सुविधा, शिक्षकांसाठी टी पॉईंट, शेकोटी, चप्पल स्टॅण्ड पिण्याचे पाणी, इन्व्हर्टर सिस्टीम, कपाटे, रॅक, प्रवेशद्वार, तार कंपाऊंड
पीयुपी

 

लेटेस्ट न्यूज़