सहाय्यक निबंधकांनी केली कारवाई, दादासाहेब गावडे यांच्यावर गैरहजर राहिल्याचा आरोप
श्रीगोंदा, ता. 23 जून 2014
तालुक्यातील पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा संस्थेचे विद्यमान संचालक दादासाहेब नारायण गावडे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी ही कारवाई केली. अपात्रतेच्या कारवाईचे पत्र नुकतेच सेवा सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना देण्यात आले आहे. या वृत्ताने पिसोरेखांड येथील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, अशी कारवाई होणारे गावडे हे कदाचित पहिलेच संचालक आहेत.
याबाबतची माहिती अशी की, पिसोरेखांड सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व सचिवांनी विद्यमान संचालकांविरोधात सहाय्यक निबंधकांकडे 20 मार्च रोजी तक्रार अर्जासह प्रस्ताव सादर केला होता. विद्यमान संचालक दादासाहेब नारायण गावडे हे संस्थेच्या सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याचे तक्रार अर्जात नमूद केले होते. या तिनही सभांपूर्वी संचालक गावडे यांना सभेचा अजेंडा पाठविण्यात आल्याचे संस्थेचे म्हणणे होते. त्यानुसार निबंधक कार्यालयाने 23 मार्च रोजी संस्थेकडे तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी करण्याची नोटीस पाठविली होती.
निबंधक कार्यालयाने या प्रकरणावर 8 एप्रिल, 22 एप्रिल व 15 मे अशा तीन सुनावण्या घेतल्या. त्यानुसार संचालक गावडे यांना संस्थेने मागील तिनही सभांबाबत पूर्वकल्पना दिल्याचे स्पष्ट झाले. मात्र तरीही गावडे हे गैरहजर राहिल्याने सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारानुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. या कारवाईनंतर गावडे यांचे संचालक पद रिक्त झाले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पिसोरेखांड येथील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. नव्या संचालकाबाबत लवकरच निवड कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे.